मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर (Election Commission of India) सडकून टीका केली. “आम्ही घटनातज्ज्ञांशी जे काही बोलतोय, स्वच्छ आणि स्पष्ट शब्दांत लिहिलेलं आहे की, काय केलं म्हणजे अपात्र ठरतात किंवा अपात्र ठरत नाही. सुप्रीम कोर्टात सध्या खटला सुरु आहे. त्यामुळे मी जास्त बोलत नाही. पण हे सगळं सुरु असताना निवडणूक आयोगाने मध्ये चोमडेपणा करायची गरज नव्हती”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी रोष व्यक्त केला. “मग माझ्या मनात अशी शंका यायला लागली की, मधल्या काळात केंद्रीय कायदा मंत्री रिजिजू जे काही म्हणाले, त्यांचं आणि न्यायालयात जे काही चाललेलं आहे, काहीही स्वतंत्र्य ठेवायचं नाही. पूर्वी पत्रकारांच्या हातात कलम असायची, पण आता कमळ असतं”, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
“स्वातंत्र्य सगळ्याचं मारुन टाकायचं. वृत्तपत्र स्वातंत्र्य मारुन टाकायचं. न्यायालय देखील आम्ही बुडाखाली घेणार असू तर देशात लोकशाही राहणार का? तो निर्णय कदाचित विरोधात जाऊ शकतो, असं त्यांनावाटत असेल म्हणून थेट बोलू शकत नाही. कारण न्यायालयाची प्रतिमा चांगली सांभाळली आहे. न्यायाधीशांनी प्रतिमा चांगली सांभाळली आहे. केंद्र सरकारची इच्छा ही आहे या बाजूने तुम्हाला निर्णय द्यायचा आहे, असं सांगितलं नसेल ना?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास होऊ नये यासाठी देखील सारवासारव केली. सुप्रीम कोर्ट आणि त्यांच्या न्यायमूर्तींनी सध्या तरी प्रतिमा चांगली ठेवल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. दुसरीकडे निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. “निवडणूक आयोग बोगसच आहे. त्याला निवडणूक चुना लगाओ आयोग का म्हणत नाही तेच कळत नाही. आमचा विश्वास उडालेला आहे. निवडणूक चुनाव आयोग नाही तर चुना लावणारा आयोग आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
“असं कधी घडलं नव्हतं. राम विलास पासवान यांच्या पक्षातसुद्धा असा वाद झालेला आहे. तिकडे त्यांनी जे केलेलं आहे, किती वर्ष झाली वाद सुरु आहे. वाद सुरु असताना त्यांनी राम विलास पासवान यांच्या मुलाला एक चिन्ह दिलेलं आहे आणि काकाला वेगळं चिन्ह दिलं आहे. हे दोन्ही गट शांत का बसले आहेत, कारण हे दोन्ही गट भाजपसोबत आहेत. म्हणजे तुमच्या सोयीनुसार सगळं करणार असाल तर ही हुकूमशाही आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“या हुकूमशाही विरोधात एकजुट व्हायला लागली आहे. परवा अरविंद केजरीवाल आले होते, त्याआधी ममता बॅनर्जी आणि आणखी काही नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या. हे महत्त्वाचं आहे. कारण आपले डोळे उघडले नाहीतर तर 2024 ची निवडणूक ही शेवटची निवडणूक असेल. आपल्याला ठरवायचं आहे. कारण कपिल सिब्बल काय बोलले ते महत्त्वाचं आहे. मी इथे जिंकण्यासाठी किंवा हरण्यासाठी उभा नाहीय. तर मी देशातील संविधान वाचवण्यासाठी उभा आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.