निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 3 मार्च 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अजूनही मणिपूरला गेले नाहीत. लक्षद्वीपला जाऊन ते समुद्रात डुबकी घेतात. द्वारकेत खोल समुद्रात गेले. मोदी समुद्राच्या तळाशी जाऊ शकतात, पण मणिपूरला जाऊ शकत नाहीत, असा जोरदार हल्ला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चढवला आहे. मोदी सरकारचा कारभार नाहीये, तो फक्त भार आहे. केवळ रामनामाचा जप करू नका. रामराज्य आणा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.
आमदार कपिल पाटील यांनी नव्या पक्षाची स्थापना केली. या निमित्ताने धारावीत एका सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. एकच प्रोडक्ट कितीवेळा लॉन्च करणार? किती वेळा घासलं तरी त्यातून काय बाहेर पडणार? मोदींशिवाय भाजपकडे कोण पर्याय आहे? आम्ही मोदींविरोधात एकत्र आलो नाही. आम्ही हुकूमशाही विरोधात आहोत. हुकूमशाहीला एकच पर्याय म्हणजे लोकशाही. आम्ही देशभक्त म्हणून एकत्र आलो आहोत. निवडणुकीपुरती जातपात बाजूला ठेवा. देशाला वाचवा. देश टिकला तर आपण धर्म टिकवू शकतो. देशाला वाचवणं हाच आपला धर्म आहे. डोळ्यासमोर देश ठेवा, असं माझे आजोबा सांगायचे. आशीर्वाद द्यायला देव पाहिजे. पण हे देव डोळ्यासमोर ठेवताय आणि देश कुठे आहे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
मी लढाईला मैदानात उतरलो आहे. तुम्ही सर्व सोबत आहात. ही लढाई एकट्याची नाही. मला पंतप्रधान व्हायचंय म्हणून नाही. ही भावी पिढ्यांची लढाई आहे. तुमच्या पिढ्या देशात राहणार आहेत. त्या लोकशाहीने राहणार की हुकूमशाहीने राहणार आहे हे ठरवणारी ही लढाई आहे. हुकूमशाहीचं थडगं शिवरायांचा महाराष्ट्र बांधल्या शिवाय राहणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.
रोजगार कुठे आहे? जिथे जातो तिथे असंतोष आहे. शेतकरी, कामगार आणि विद्यार्थी आक्रोश करत आहेत. सर्वांच्या मनात ईव्हीएमची काळजी वाटत आहे. यावेळी त्यांनी ईव्हीएम घोटाळा केला तर असंतोषाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही. ईव्हीएम घोटाळा करून बघाच. देशभर आक्रोश आहे, असं ते म्हणाले.