मुंबई | 17 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत एक गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘मैं मोदी का परिवार हुँ’, अशा आशयाचं हे गाणं आहे. या गाण्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि भाजवर निशाणा साधला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईत समारोप होतोय. या समारोपाच्या निमित्ताने इंडिया आघाडीची मुंबईत भव्य सभा आयोजित करण्यात आलीय. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजवर सडकून टीका केली. “महात्मा गांधी यांनी ४२ साली छोडो भारतचा नारा दिला होता. देशात जी हुकूमशाही टपलेली आहे तिला हद्दपार करण्यासाठी तुम्ही शिवाजी पार्क निवडलं त्याबद्दल आभार मानतो. भाजप हा फुगा आहे. या फुग्यात हवा भरण्याचं काम आम्ही केलं”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
“संपूर्ण देशात त्यांचे दोन खासदार होते. त्या फुग्यात आम्ही हवा भरली, आता त्यांच्या डोक्यात हवा गेली. त्यांनी ४०० पारचा नारा दिला. काय फर्निचरचं दुकान आहे का? खुर्च्या बनवत आहात का? ४०० पार म्हणजे काय फर्निचरचं दुकान काढत आहात का?”, असे प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.
“ही परिस्थिती केवळ महाराष्ट्रात नाही. तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ही परिस्थिती सारखीच आहे. आपण इंडिया आघाडीची बैठक घेतली. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत होते विरोधकांची बैठक आहे. आम्ही विरोधक आहोत. पण हुकूमशाहीच्या विरोधातले आहोत. तुम्ही घराणेशाहीवर आरोप करता. तुमच्या परिवारात तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढाच परिवार आहे. बाकी परिवार आहे कुठे?”, असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
“ही लढाई संविधान वाचवायची आहे. बाळासाहेब म्हणायचे, याची सुरुवात कोर्टापासून करा. कोर्टात जो साक्ष द्यायला येतो. तो धर्मग्रंथावर हात ठेवतो. त्याऐवजी संविधान ठेवा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.