मुंबई | 16 जानेवारी 2024 : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालावरुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सडकून टीका केली. “पात्र अपात्रतेचा निर्णय जनता घेईल. जनतेने म्हटलं तर मी घरी बसेल. पण लोकशाही राहणार आहे की नाही जिवंत? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व त्याचा अधिकार राहील की नाही? हा प्रश्न आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या चौकटीत निर्णय द्यायचा असतो. कोर्ट फाशीची शिक्षा सुनावतं. प्रत्यक्षात अंमलात आणतो जल्लाद. त्या जल्लादाचं काम लवादाला दिलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने सर्व तयार करून दिलं. लवाद म्हणतो मी फाशी कशी देऊ? याचा जन्माचा दाखला नाही. अरे याचा जन्माचा दाखला तपासायला सांगितलं नव्हतं. त्याने जो गुन्हा केला त्याची शिक्षा द्यायला सांगितलं होतं”, असा शब्दांत उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांच्या निकालावर निशाणा साधला.
“निवडणूक आयोग म्हणजे दिव्यच आहे. एखादी व्यक्ती बँकेत पासबुक घेऊन पैसे काढायला गेला तर बँक म्हणते तुमचं खातच नाही. अहो पास बुक आहे, चेक आहे. मग खातं कसं नाही? खातं गिळलं का तुम्ही? गिळून बसलात. केवढा मोठा कट आहे. त्या कटाचं मूळ सर्वांना माहीत आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“२०२२ साली जेपी नड्डा आले होते. त्यांना काही अधिकार आहे की नाही माहीत नाही. ते असं म्हणाले होते, या देशात फक्त एकच पक्ष राहणार तो म्हणजे भाजप. तिथून या कटकारस्थानाला सुरुवात झाली. त्यांनी ईडी, सीबीआय, आयकर सर्वांना कटात घेतलं. घाव घालायला सुरुवात केली. शिवसेना केली. राष्ट्रवादी केली. सर्व पक्ष संपवणार हे भाजपचा अध्यक्ष बोलतो तर लोकशाहीचा डंका पिटणाऱ्या निवडणूक आयोगाला हे मान्य आहे काय? खेचा त्यांची शेंडी. शेंडी बोलतो. नड्डा बोललो तर चुकीचा अर्थ घेऊ नका”, असा मिश्किल चिमटा उद्धव ठाकरेंनी काढला.
“मी मुद्दाम शेंडी बोललो. एखादा अध्यक्ष उघड बोलतो एकच पक्ष राहील. सर्व पक्ष संपून जाईल. ही घातक लढाई सुरू झाली आहे. रामशास्त्री ज्या महाराष्ट्रात जन्माला आले. ज्या महाराष्ट्रात बाबासाहेब जन्माला आले. त्याच महाराष्ट्रापासून यांनी लोकशाहीच्या खुनाला सुरुवात केली. याच मातीत ही अवदसा जन्माला आली. हे लोकशाहीचे हत्यारे जन्म घेत आहेत. त्यांना महाशक्ती साथ देत आहे. महाराष्ट्र अशा गद्दारांना थारा देत नाही. त्यांना संपवून टाकते. हा क्रम पाहिल्यावर आज पीसी घेणं गरजेचं होतं”, अशी भूमिका ठाकरेंनी मांडली.
“शिवसेनेने सर्व पेपर नीट दिले. काय काढायचं ते काढून देतो. समजा आम्ही दिलेली १९९९ साली दिलेली घटना अंतिम मानली तर २०१४ला मला काय म्हणून मोदींना पाठिंबा देण्यासाठी बोलावलं होतं? कशासाठी माझी सही घेतली? कोण तरी ढोकळावाला शेवफाफड्या वाल्याची घ्यायची होती. मला बोलावलं होतं. तुम्हाला माहीत असेल, २०१९साली जी रांग बसली होती, त्यात मी बसलो होतो. मोदी म्हणाले होते, अब बालासाहेब नही रहे मुझे सलाह मशवरा करना हो तो उद्धव ठाकरे से बात करता हूँ. माझी पंचायत काय होते. घराणेशाहीचा आरोप झाल्यावर मला घराण्याचे आरोप आठवतात. मनात समानार्थी शब्द आठवावे लागतात”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.