मुंबई : सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू आहे. यावेळी कोर्टाने काही निरीक्षणे नोंदवली आहेत. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या विरोधात निर्णय दिल्यानंतर त्यानुषंगानेही कोर्टात युक्तिवाद करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आजच्या दैनिक ‘सामना’तून शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली आहे. रस्त्यावरील कुंडीचोर म्हणजे खरी शिवसेना नाही. आजचा चोर गट उद्या विधिमंडळात नसेल. त्यावेळी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं काय होणार? असा सवाल दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
रस्त्यांवरील ‘कुंड्या’ आलिशान गाडीत चोरून न्याव्यात त्याप्रमाणे निवडणूक आयोगाबाहेर दिमाखदार गाड्या लावून त्यांनी धनुष्यबाण व शिवसेना चोरून नेली. भाजपचे राज्य असल्यानेच श्रीमंतांना रस्त्यांवरील कुंड्या चोरण्याची विकृती निर्माण झाली, पण हे रस्त्यावरील कुंडीचोर म्हणजे खरी शिवसेना नव्हे. असूच शकत नाही. निकालाची पर्वा आम्हाला नाही, पण संविधान, सत्य व जनतेचा आवाज मारला जाऊ नये यासाठी हा लढा आहे ! घर म्हणजे चार भिंती नाहीत. शिवसेना म्हणजे विधिमंडळ नाही. निकाल हाच आहे!
महाराष्ट्रातील तथाकथित सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मिंधे गटाचे वकील सांगत आहेत, ”आम्ही म्हणजेच शिवसेना!” या ‘आम्ही’वर न्या. चंद्रचूड यांनी घेतलेला आक्षेप महत्त्वाचा आहे. ”विधिमंडळात तुमच्याकडे बहुमत आहे याचा अर्थ तुम्ही म्हणजे पक्ष होत नाही.” न्या. चंद्रचूड यांनी नेमके विधान केले आहे. विधिमंडळातील फक्त चाळीस आमदार म्हणजेच शिवसेना, असा निर्णय निवडणूक आयोगातील ईस्ट इंडिया कंपनीच्या एजंटांनी दिला काय आणि या विकतच्या बहुमतवाल्यांनी नाचायलाच सुरुवात केली, पण कितीही नाचकाम केले तरी सर्वोच्च न्यायालयात न्यायासाठी सुनावणी सुरू आहे आणि न्याय मेला नाही हे लवकरच कळेल.
महाशक्तीने निवडणूक आयोग खिशात घातला, पण सर्वोच्च न्यायालय हे मंदिर आहे. त्या मंदिरात चाळीस चप्पलचोरांना थारा नाही. दिल्लीतील वृत्तपत्रांत एक मजेशीर बातमी प्रसिद्ध झाली आहे. शिवसेना व धनुष्यबाणाच्या चोरीशी त्या बातमीचा संबंध जोडता येईल. हरयाणातील गुरगाव येथे एक अतिश्रीमंत माणूस आपल्या कोटय़वधीच्या आलिशान गाडीत रस्त्यांवरील सरकारी कुंड्या घालून निघून गेला. सध्या ‘G-20’ नामक जो काही आंतरराष्ट्रीय उत्सव आपल्या देशात सुरू आहे, त्या जागतिक प्रतिनिधींना आमचा देश सुंदर वाटावा, रस्त्यांच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून या कुंड्या झाडांसह रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आल्या. त्या कुंड्या एका श्रीमंताने दिवसाढवळय़ा चोरून त्याच्या घराची शोभा वाढवली.
दोन्ही राज्यांत भाजपचीच संस्कारक्षम राज्ये आहेत. कुंड्या जनतेसाठी होत्या. त्या भाजपच्या राज्यात श्रीमंतांनी चोरल्या. शिवसेना व धनुष्यबाणाच्या बाबतीत नेमके हेच घडले. दिवसाढवळय़ा चाळीस चोरांनी दरोडा टाकला. चाळीस जणांची चोरांची टोळी हा ‘चोरबाजार’ होऊ शकतो, पण चोरबाजार म्हणजे शिवसेना हे कसे घडेल?
विधिमंडळातील फुटीर आमदारांचा ‘चोर गट’ म्हणजेच शिवसेना हा निर्णय बकवास आहे. न्या. चंद्रचूड यांनी तेच सांगितले आहे. विधिमंडळ पक्ष प्रत्येक निवडणुकीनुसार बदलत असतो. आजचा ‘चोर गट’ उद्या विधिमंडळात नसेल. मग निवडणूक आयोगाच्या आजच्या निर्णयाचे काय? शिंदे गटात स्वबळावर काही करण्याची कुवत नाहीच. हिंमतदेखील नाही.