मुंबई: दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाची धूळ चाळणाऱ्या शिवसेनेच्या विजयी उमेदवार कलाबेन डेलकर यांनी नुकतीच मातोश्रीवर जाऊन ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी रश्मी ठाकरे यांनी विजयश्री मिळवलेल्या कलाबेन डेलकर यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण केले. या दोघींचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अलीकडच्या काळात महाराष्ट्रातील राजकारणात विरोधकांवर अत्यंत खालच्या पातळीला जाऊन आणि वैयक्तिक स्वरुपाची चिखलफेक होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत रश्मी ठाकरे आणि कलाबेन डेलकरांचे हे छायाचित्र महाराष्ट्राच्या मूळच्या राजकीय संस्कृतीची आठवण करुन देणारे असल्याची भावना व्यक्त होत आहे.
शिवसेना आणि भाजपमधील थेट लढतीमुळे दादरा-नगर हवेलीची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. या निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील अनेक नेते मैदानात उतरले होते. अखेर कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या महेश गावीत यांचा 47 हजार 447 मतांनी पराभव केला होता. यानिमित्ताने महाराष्ट्राबाहेर पहिल्यांदाच शिवसेनेचा खासदार निवडून आला. या विजयानंतर कलाबेन डेलकर आणि त्यांचा मुलगा अभिनव डेलकर यांनी बुधवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर कलाबेन डेलकरांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवादही साधलाय. शिवसेना परिवार, प्रदेशातील लोकांचं आणि डेलकरांचा आशीर्वाद होता. त्यामुळे मी चांगल्या मताधिक्क्यानं निवडून आली. त्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठीच मी उद्धव ठाकरेंना भेटायला आलेय, असंही त्या म्हणाल्यात. जे आमचे निवडणुकीचे मुद्दे आहेत ते घेऊन पुढे जाणार आहोत. विकासाचा मुद्दा होता. बेरोजगारीचा मुद्दा होता. तीच आमची पुढची रणनीती असणार आहे. त्याद्वारेच आम्ही पुढे जाणार आहोत. उद्धव ठाकरे लवकरच आमच्या प्रदेशात येणार आहेत, असं त्यांनी आश्वासन दिलंय, याचाही कलाबेन डेलकरांनी आवर्जून उल्लेख केलाय.
दादरा नगर हवेली लोकसभा मतदार संघ विजयी उमेदवार श्रीमती @kalabendelkar जी यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री @OfficeofUT साहेब यांची भेट घेतली. यावेळी सौ. रश्मी ठाकरे जी यांनी त्यांचे औक्षण केले. युवासेना प्रमुख, मंत्री @AUThackeray जी उपस्थित होते.@rautsanjay61 @ianildesai pic.twitter.com/RNnOXz980T
— प्रतिक मुंबईकर (@MumbaikarPratik) November 3, 2021
कलाबेन यांचे पती मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली होती. मुंबईतील सी ग्रीन हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, नंतर सुसाईड नोटमध्ये दादरा नगर हवेलीतील प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचं नाव आलं होतं. पटेल यांच्या दबावामुळेच आत्महत्या करत असल्याचं डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे कलाबेन डेलकर यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी मुलासह शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेने कलाबेन यांना पोटनिवडणुकीचं तिकीटही दिलं होतं.
हेही वाचा :
दादरा नगरमध्ये भाजप का हरली?, कलाबेन डेलकरांच्या विजयामागचं कारण काय?; शिवसेनेला बळ मिळणार?