मुंबईः शिवसेनेने (Shivsena) हिंदुत्वाची चादर बाजूला टाकली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उद्या ‘आयसीस’शीही चर्चा करतील, अशी टीका शनिवारी भाजप नेते नितेश राणे यांनी केली. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी काल ‘एमआयएम’चे (MIM) खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशात तुमच्यामुळे भाजप जिंकली, असा आरोप ‘एमआयएम’वर केला. हा आरोप भविष्यात लावला जाऊ नये, म्हणून आम्ही महाविकास आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव देतोय, असे खासदार जलील म्हणाले. तसेच ‘तुमच्या तीनचाकी रिक्षाला एक चाक जोडा, मोटर कार करा, बघा कशी चालतेय…’ असा खोचक सल्लाही दिला. शिवसेनेने हा प्रस्ताव फेटाळून लावलाय. मात्र, ‘एमआयएम’ला आघाडीत घ्यायचे की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील, असे वक्त्यव्य आज राजेश टोपे यांनी केले आहे. टोपे यांच्या या विधानावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच ‘एमआयएम’बाबत ‘राष्ट्रवादी’चा सॉफ्ट कॉर्नर असल्याचेही बोलले जात आहेत. या प्रस्तावानंतर भाजपने शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करत शिवसेना हिरवी सेना झाल्याची टीका केलीय. नितेश राणे यांनीही तोच सूर आळवलाय.
उद्धव उद्या अफगाणिस्तानला जातील…
नितेश राणे म्हणाले की, ‘एमआयएम’ हा कट्टरतावादी पक्ष आहे. टोकाची भूमिका घेतो. ज्या पद्धतीने शिवसेना अजानची स्पर्धा घेते. टिपू सुलतानच्या नावाचा गवगवा करते. एकंदरीत हिंदुत्वाची चादर बाजूला टाकून शिवसेना स्वतःला सेक्युलर म्हणवून घेण्याचे काम करते आहे. सध्या एका ‘एमआयएम’ या कट्टरतावादी पक्षाला तुम्ही हवे हवेसे वाटता, तर उद्या तुम्ही ‘आयसीस’ला ही आवडणार. आता ‘आयसीस’ बरोबर चर्चा करण्याचेच राहिले आहे. उद्या उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत बोलतील की आम्ही ‘आयसीस’ बरोबर चर्चा करायला अफगाणिस्तानला चाललोय. एवढेच राहिलेले आहे. करून दाखवलं, याचा खरा अर्थ आज शिवसेनेने महाराष्ट्रासमोर करून दाखवला.
राऊत ‘राष्ट्रवादी’चे एजंट…
‘एमआयएम’बरोबर युती होऊच शकत नाही, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते. या वक्तव्यावर नितेश राणे म्हणाले की, दाऊद बरोबर फिरणारे, अंडरवर्ल्ड-अतिरेकी यांच्याबरोबर सौदा करणारे हे लोक शिवसेनेला आणि संजय राऊतांना चालतात? मुळामध्ये संजय राऊत हे शिवसेनेचे नेते नाहीत, तर ते ‘राष्ट्रवादी’चे एजंट आहेत. आता येणाऱ्या खासदारकीवेळी ते दिसेल. त्यांना शिवसेना आणि भाजपमध्ये भांडणं लावण्याची एक कलमी सुपारी दिली आहे. त्यांना शिवसेनेबद्दल काहीही पडले नाही.
नशेडी कसा बोलतो हे राऊतांना ठावे…
संजय राऊत यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली होती. यालाही नितेश राणे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, नशेडी लोक कसे वागतात, हे संजय राऊत यांना कदाचित चांगले माहीत असेल. कारण त्यांच्या अवती-भोवती, मालकांच्या घरी नशेडी लोक खूप असतात असे ऐकले आहे. कारण माणूस नशा करून नेमके कसे बोलतो हे संजय राऊतांना माहीत असल्यामुळे त्यांनी असे वक्तव्य केले आहे, असा दावाही त्यांनी केला.
इतर बातम्याः