दिनेश दुखंडे, Tv9 मराठी, मुंबई | 7 नोव्हेंबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याच्या घडीतील एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे संध्याकाळी पाच वाजता शरद पवारांच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर दाखल झाले आहेत. या तीनही नेत्यांमध्ये आज अतिशय महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीवर राज्यातील आगामी काळातील महत्त्वाच्या घडामोडी अवलंबून असण्याची दाट शक्यता आहे.
राज्यात आगामी काळात लोकसभेची निवडणूक असणार आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटप कसं करावं, कुणाला किती जागा द्यायच्या, याबाबत या तीनही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत कुणाला कुठल्या जागा द्यायच्या, याबाबत अतिशय महत्त्वाची चर्चा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
देशातील महत्त्वाच्या विरोधी पक्षांची एकजूट झालीय. या विरोधी पक्षांची इंडिया आघाडी स्थापन झालीय. या इंडिया आघाडीच्या तीन मोठ्या मॅरेथॉन बैठका देखील पार पडल्या आहेत. पण त्यानंतर इंडिया आघाडीच्या फार बैठका पार पडल्या नाहीत. तसेच उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. इंडिया आघाडीतील पक्षांमधील संबंध ताणले गेले असले तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे संबंध दृढ राहिले पाहिजेत, यासाठी प्रयत्न केला जातोय.
आगामी निवडणुका महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्र लढणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात भेट होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संवाद आवश्यक आहे, तो संवाद व्हावा यासाठी ठाकरे आणि पवार या दोन नेत्यांची आज भेट होत आहे. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटप आणि प्रचार कसा करावा, याबाबत चर्चा करण्यासाठी आजची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.