मुंबई | 16 नोव्हेंबर 2023 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यप्रदेशच्या निवडणुकीत मतदारांना अयोध्येतील रामल्लाचं मोफत दर्शन देण्याचं आश्वासन दिलं आहे. शाह यांच्या या आश्वासनाला माजी मुख्यमंत्री उद्द व ठाकरे यांनी हरकत घेतली आहे. निवडणुकीत धार्मिक गोष्टींचं आश्वासन देता येतं काय? निवडणूक आयोगाने आचारसंहितेत बदल केला आहे काय? की भाजपला नियमातून डावललं गेलं आहे. नियम फक्त आम्हालाच आहे काय? असा सवाल करणारे खरमरीत पत्र उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला लिहिलं आहे. पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी याबाबतची माहितीही दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकाच्या निवडणुकीत बजरंग बली की जयचा नारा दिला होता. त्यावेळी त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही. आता मध्यप्रदेशाच्या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोफत रामलल्लाचं दर्शन घडवून देण्याचं आश्वासन मतदारांना दिलं आहे. निवडणुकीत धर्मावर आधारीत विधानं करून मतदान मागता येत नाहीत.
हा नियम आता निवडणूक आयोगाने शिथील केला आहे काय? धार्मिक आधारावर मतं मागितली म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या सहा शिलेदारांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यात आला होता. ते चुकीचं होतं की बरोबर? मोदी आणि शाह आता जे करत आहेत ते योग्य आहे काय? आचारसंहितेत बसतं का? निवडणूक आयोगाने नियम शिथील केले का? केले असतील तर कधी केले?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
निवडणूक आयोगाने आचार संहितेत बदल केला असेल तर तो सर्वच राजकीय पक्षांना सांगितला पाहिजे. केवळ हा बदल केल्याचं भाजपलाच सांगितलं का?, असा सवाल करतानाच राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. यावरून निवडणूक आयोग जागरूक आहे हे दिसून येतं. मोदी आणि शाह यांनी निवडणुकीत जे केलं ते चुकीचं आहे असं वाटत नाही. मग आम्ही जे केलं होतं ते अयोग्य होतं का? हे आम्हाला निवडणूक आयोगाने सांगावं. आम्हाला आपल्या सरकारी भाषेत अवगत केलं तरी चालेल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. याबाबतचं पत्र निवडणूक आयोगाला पाठवल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.