आज राज्यात पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडलं. मुंबईत अनेक ठिकाणी संथ गतीने मतदान होत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. यावरुन उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर थेट आरोप केला. मुंबईत दिवसभर संथ गतीनं मतदान होत असल्याच्या तक्रारी आल्याने पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी ज्या ठिकाणी शिवसेनेला मतदान होतंय, त्याच ठिकाणी विलंब होत असल्याचा आरोप केलाय.
मुंबई, ठाणे आणि कल्याणमध्ये बऱ्याच मतदान केंद्रांच्या बाहेर रांगाच्या रांगा दिसल्या. ज्यात वयोवृद्धांपासून महिलांची संख्याही मोठी होती. काही ठिकाणी मतदारांना 4-4 तास मतदानाला लागले. तर हा मोदी सरकारचा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. सकाळचे 5 वाजले तरी मतदान केल्याशिवाय अधिकाऱ्यांना बाहेर पडू देवू नका, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.
उद्धव ठाकरेंनी भाजप आणि निवडणूक आयोगावर आरोप केल्यानंतर फडणवीसांनी ट्विट करुन उत्तर दिलंय. पराभव दिसत असल्याची टीका फडणवीसांनी केली. ते म्हणाले की, मुंबईत संथ गतीनं मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. 4 जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत. माझी तमाम मुंबईकरांना विनंती आहे की, मतदान केंद्रावर जा आणि मोठ्या संख्येने मतदान करा. 6 वाजले तरी जितके लोक आतमध्ये असतील, त्या प्रत्येकाला मतदान करता येते. त्यामुळे मतदानाचा आपला हक्क बजावल्याशिवाय राहू नका.
संथ गतीनं मतदानाच्या तक्रारीनंतर मुंबईत काही ठिकाणी 6 वाजताच्या नंतरही जे मतदार रांगेत होते. त्यांना टोकन देण्यात आलं. म्हणजेच 6 वाजताच्या नंतरही त्यांना मतदान करता आलं. मात्र मुंब्य्रात टोकन न वाटता मतदार केंद्र बंद करण्यात आलं.
पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे मुंबईतल्या रस्त्यावर आले आणि मतदान केंद्राबाहेर रांगेतल्या मतदारांचं मतदान पूर्ण करुन घेण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या.
मुंबईत मुद्दाम संथ गतीनं मतदान झाल्याचा आरोप झाला तर ठाकरे गटाच्या आदेश बांदेकरांनी पवईत हिरानंदनीच्या मतदान केंद्रावर EVM बंद झाल्याचा आरोप केला. बांदेकरांच्या या व्हिडीओनंतर आयोगाकडून 2 तासांनी EVM मशीन दुरुस्त झाली आणि मतदान प्रक्रिया सुरळीत झाली.
फक्त उद्धव ठाकरेच नाही तर भाजपचे उत्तर मुंबईचे उमेदवार पियूष गोयल यांनीही संथ गतीनं मतदान होत असल्याचा आरोप केला. त्यावरुन त्यांनी संतापही व्यक्त केला.