मुंबई 13 जानेवारी 2024 : अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोध केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी खास ठाकरे शैलीत या कार्यक्रमाचा खरपूस समाचार घेतला. या देशाला राष्ट्रपती आहेत, असा चिमटा काढत, त्यांनी रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्याची आग्रही मागणी केली. त्यासाठी त्यांनी सोमनाथ मंदिराचा दाखला दिला. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्याची आठवण त्यांनी करुन दिली.
राष्ट्रपतींना दिले निमंत्रण
22 तारखेला उद्धव ठाकरे नाशिकमधील काळाराम मंदिरात जाऊन विधीवत पूजा करतील. तर गोदावरीची आरती सुद्धा करतील. या सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना निमंत्रण पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे खासदार राष्ट्रपती यांना भेटून निमंत्रण पत्रिका देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. ‘आमची अशी प्रामाणिक इच्छा आहे की हा एवढा मोठा प्रसंग आहे तिथे या देशाला राष्ट्रपती देखील आहेत आणि त्यांची सुद्धा महत्त्वाची भूमिका जशी त्यावेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी निभावली होती किंवा त्यांना बोलवण्यात आलं होतं तसं राष्ट्रपतीने तिकडे बोलावं बोलावावं’ अशी मागणी त्यांनी केली.
हा तर भाजपचा विषय
ही केवळ प्रभू श्री रामचंद्र सीतामाई यांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा म्हणजे त्यांची प्राणप्रतिष्ठा नाही. तर जो वर्षांनू वर्ष लढा चालला होता. ज्याला अंतिमता सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय मिळाला. म्हणजेच ही देशाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अस्मितेच्या प्राणप्रतिष्ठीचीही तो क्षण आहे. त्याला राष्ट्रपतीला सुद्धा आमंत्रित करावं अशी आमची मागणी आहे ते करतील न करतील हा त्यांचा प्रश्न आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दिवाळं निघालं त्याचं काय
22 तारखेला दिवाळी झालीच पाहिजे. पण जे दिवाळ निघालय त्याच काय ते पाहा, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. देशाचं जे दिवाळं निघालं आहे त्यावरून चर्चा करा ती चर्चा करा चाय पे चर्चा करा, बिस्कीट पे चर्चा करा, जलेबी फाफडावर चर्चा करा, फरसाणवर चर्चा करा, पण चर्चा करा असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.