मुंबई- तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांचा अहंकार व स्वार्थामुळे मुंबईची मेट्रो रखडली, आरे कारशेडचे (Aarey Metro car shed) काम बंद पडले. असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांनी केला आहे. कारशेडसाठी दुसरी पर्यायी जागाही ठाकरे सरकार उपलब्ध करू शकले नाही, यामुळे अनेक समस्या उद्भवल्या. त्यामुळे मुंबईची मेट्रो रखडली, याला उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. कांजुरमार्ग येथील जागा कारशेडसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही, हे उद्धव ठाकरे यांना माहित होते. याबाबत उद्धव ठाकरे यांनी नेमलेल्या समितीनेही आपल्या अहवालात स्पष्टपणे सांगितले होते की, कांजुरमार्गची जागा सहजासहजी उपलब्ध होणार नाही. न्यायालयाने स्थगिती दिली आहे. कांजुरमार्गला कारशेड हलवण्याचा निर्णय घेतला तर मेट्रो 4 वर्षे मागे जाईल आणि त्यामुळे किंमत प्रचंड वाढेल, असेही अधिकाऱ्यांनी व तज्ञांनी सांगितलेले होते. मात्र तरीही स्वार्थामुळे आरे कारशेडची जागा बदलण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. ठाकरे सरकारच्या निर्णयामुळे मेट्रो 3 चे काम 3 वर्षे पुढे गेले, यामुळे १० हजार कोटींनी या प्रकल्पाची किंमत वाढली याला जवाबदार उद्धव ठाकरेच आहेत. असा आरोपही किरीट सोमय्यांनी केला आहे.
आरे कारशेडच्या ऐवजी दोन पर्यायी जागेबाबत उद्धव ठाकरे सरकारने चर्चा केली होती. त्यातील पहिली जागा म्हणजे
कांजुर कारशेड ज्याला न्यायालयाने स्थगिती दिली. तर दुसरी जागा म्हणजे रॉयल पाम खाजगी बिल्डर यांची जागा होती. या जागेवर कारशेड हलवण्यात आली असती तर रॉयल पामच्या मालकाला रु. 4,800 कोटींचा TDR मिळणार होता. या विषयावर आंदोलन करणाऱ्या वनशक्ती या सामाजिक संस्थेने ही जागा कारशेडसाठी लिखीत स्वरुपात सुचवली होती. 2017-2018 मध्ये या विषयावर आंदोलन करणाऱ्या लोकांविरोधात मुंबई मेट्रो रेलवे कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी तक्रारही नोंदविली होती. बी. के. सी. पोलीस स्टेशनने याचा तपासही केला होता. त्यात बंगळुरुच्या एक्सोटेल टेककॉम प्रा.लि. यांना यासंदर्भात अपप्रचार करण्यासाठी डिजीटल मिडिया व सोशल मिडियाचा उपयोग करण्यासाठी सांगण्यात आले होते. असा आरोप किरिट सोमय्या यांनी केला आहे. यासाठी एक्सोटेल टेककॉम या कंपनीला अमेरिकेहून पैसे ही आले होते. असेही सोमय्या म्हणाले. यासंदर्भात पोलीस तपास चालू असताना ठाकरे सरकारने हा तपास थांबवण्याचा निर्णय घेतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
न्यायालयात याची सी समरी बंद करण्याचा अहवाल ही सुपूर्त करण्यात आला होता. अजूनपर्यंत न्यायालयाने हा अहवाल स्वीकारलेला नाही. असेही किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे. हा तपास बंद करण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय रद्द करावा व मुंबईची मेट्रो रुळावरून खाली आणण्याचे जे षड्यंत्र होते त्याची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सोमय्या यांनी केली आहे. एक्सोटेल टेककॉमच्या मागे कोण आहे, याचा तपास व्हावा, अशी मागणीही किरीट सोमैया यांनी केली आहे.