प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील म्हणून राज्य सरकारने नियुक्त केलं आहे. निकम यांची नियुक्ती रद्द करण्यासाठी विजय पालांडे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. निकम हे एका पक्षाचे सदस्य आहेत. ते सरकारी वकील म्हणून काम कसे करू शकतात? असा सवाल या याचिकेतून करण्यात आला आहे. आता या प्रकरणात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. निकम यांनी निवडणूक लढली आहे. त्यांनी स्वत:वर राजकीय पक्षाचा शिक्का मारला आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली आहे. उज्ज्वल निकम हे मोठे वकील आहेत. त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली आहे. त्यांनी स्वत:वर राजकीय शिक्का मारला आहे. त्यामुळे त्यंना या प्रश्नांना तोंड द्यावा लागेल. किंवा मला जबरदस्तीने निवडणूक लढण्यास भाग पाडलं हे त्यांना सांगावं लागेल. कसाबला फाशी देण्यात माझा हात असला तरी मला लोकसभा निवडणुकीत फासावर लटकवण्याचा प्रयत्न भाजपने केला हे त्यांना समोर येऊन सांगावं लागेल, असं आव्हान देतानाच नाही तर त्यांना त्यांच्यावर लागलेला भाजप किंवा संघाचा शिक्का पुसता येणं अशक्य आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
कालपर्यंत तुम्ही भाजपच्या तिकीटावर लढत होता. भाजपचा शिक्का घेऊन फिरत होता. त्यामुळे आता मला माफ करा, असं निकम यांनी म्हटलं पाहिजे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलं. लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून इंडिया आघाडीची चर्चा सुरू आहे. मी दिल्लीत जात आहे. काँग्रेच्या वरिष्ठांशी चर्चा होत आहे. लोकशाहीचा रखवालदार लोकसभा अध्यक्ष असतो. त्या पदावर समान न्याय देणारी व्यक्ती बसली पाहिजे. गेल्या दहा वर्षात त्या पदावर ज्या पद्धतीचे लोक बसले आहेत, ते बरोबर नव्हते. विरोधकांशी चर्चा करून नाव ठरंल पाहिजे. कायद्याने उपाध्यक्षपद आम्हाला दिलं पाहिजे. निवडणूक लढायची असेल तर आम्ही सर्व बसून चर्चा करू, असं राऊत म्हणाले.
पुण्यातील ड्रग्स पार्टींवरूनही त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. पुणे आणि नाशिक ही दोन शहरं ड्रग्सच्या विळख्यात गेली आहेत. नाशिक आणि पुण्यात हजारो कोटीचे ड्रग्स आहेत. गुजरातमधून हे ड्रग्स येत आहेत. तसं सिद्ध झालंय. गुजरात हे ड्रग्सचं केंद्र आहे. काही पकडलं जातंय, काही वळवलं जातंय. यांना राजकीय संरक्षण कुणाचं आहे? याचा तपास व्हावा. कोणत्या राजकीय पक्षासाठी हा पैसा वापरला गेला? पालकमंत्री कोण होते? पोलीस आयुक्त कोण होतं? हा तपासाचा भाग आहे. पुणे दुर्देवाने गुन्हेगारी आणि अंमलीपदार्थाचे मुख्य केंद्र होत आहे. त्याला गृहमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री जबाबदार आहेत. पाच वर्षात जे पोलीस आयुक्त आणि पालकमंत्री लाभले ते जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला.