निनाद करमरकर, उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये एका तरुणाचं अपहरण करत त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडलाय. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद होऊनही या प्रकरणी पोलीस गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करत या तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं खळबळ माजली आहे. जुन्या वादातून हा प्रकार घडला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
काय आहे प्रकरण
उल्हासनगरच्या कॅम्प ५ परिसरात सोहन गुरुबक्षसिंघानी हा तरुण राहतो. सोहनचा मित्र धीरज वलेचा याचे नवीन केसवानी याच्यासोबत जुने वाद आहेत. याच वादातून धीरज याला जीवे मारण्याचा कट नवीन केसवानी याने रचला. त्यासाठी १६ मार्च रोजी रात्री नवीन केसवानी याने सोहन याला गाठलं आणि अन्य एका सहकाऱ्याच्या मदतीने दुचाकीवरून त्याचं अपहरण केलं. त्याला कॅम्प ४ भागात घेऊन जात काहीही सांगून धीरज वलेचा याला इथे बोलाव, असं नवीन केसवानीने सांगितलं.
मात्र सोहन याने त्याला नकार देताच नवीन केसवानी याने त्याला बंदूक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप सोहन गुरुबक्षसिंघानी याने केलाय. यानंतर सोहन का तिथून पळून गेला आणि रात्रभर मित्राकडे थांबला.
तक्रार घेण्यास टाळाटाळ
सकाळी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप सोहन याने केला. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागूनही गुन्हा दाखल होत नसल्यानं सोहन याने फिनाईल पीत आत्महत्येचा प्रयत्न केला.
यानंतर मात्र पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केल्याची माहिती सोहन याने दिली. याप्रकरणी सर्व पुरावे पोलिसांना दिले असून पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी, अशी मागणी सोहन गुरुबक्षसिंघानी याने केली आहे. तर या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली आहे.