मुंबई : अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन अरुण गवळी सध्या 28 दिवसांच्या फरलोवर तुरुंगाबाहेर आहे. आज त्याने मुंबईत आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यामागे कारणही असेच खास होते. फरलोचे दिवस संपवून पुन्हा तुरुंगात परतण्याआधी त्याने एक महत्त्वाचं काम हाती घेतलं आहे. त्यासाठीच त्याने हा मेळावा बोलावला होता.
अरुण गवळी मुलगी गीता गवळीला भायखळा येथून विधानसभा निवडणुकीला उतरवत आहे. त्याची तयारी म्हणून त्याने हालचालीही सुरु केल्या आहेत. याचाच भाग म्हणून त्याने आज आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. हा मेळावा दगडी चाळ येथे पार पडला.
अरुण गवळी शिवसेनेच्या नगरसेवकाच्या हत्येप्रकरणात शिक्षा भोगत आहे. फरलोवर बाहेर आल्यावर त्याने आपल्या मुलीच्या राजकीय भविष्यासाठी जुळवाजुळव सुरु केली आहे. फरलो मंजूर करताना गवळीला प्रसार माध्यमांशी न बोलण्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर त्याने माध्यमांशी बोलणे टाळले. यावेळी त्याची मुलगी गीता गवळीने माध्यमांना मेळव्याची माहिती दिली.
गळवी 9 मे रोजी फरलोवर तुरुंगाबाहेर आला. 7 जूनला त्याचा फरलो (जामिन) संपणार आहे. त्याआधी त्याने कार्यकर्त्यांची मते जाणून घेत पुढील रणनीती आखली आहे. त्यामुळे आता काही काळात होणाऱ्या राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीत अरुण गवळीचा पक्ष आणि त्याची मुलगी कितपत यश मिळवते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.