‘वंचित’ने प्रणिती शिंदे यांना डिवचलं, भाजपच्या पोस्टरवर फोटो लावत साधला निशाणा

| Updated on: Mar 18, 2024 | 5:19 PM

वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना डिवचलं आहे. वंचितकडून त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर फोटो ट्विट करत प्रणिती शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. या टीकेला प्रणिती शिंदे यांच्याकडून काय प्रत्युत्तर देण्यात येतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वंचितने प्रणिती शिंदे यांना डिवचलं, भाजपच्या पोस्टरवर फोटो लावत साधला निशाणा
Follow us on

मुंबई | 18 मार्च 2024 : वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना डिवचलं आहे. “तुम्ही ठीक आहात? आम्हाला समजले आहे की, इतके दिवस थांबल्यानंतरही तुमचे तुमच्या पक्षासोबत जमत नाही. नवीन पक्षाचा मुहूर्त कधी आहे?”, असा सवाल वंचित बहुजन आघाडीने केला आहे. वंचित बहुजन आघाडीने ट्विटरवर प्रणिती शिंदे यांचा भाजपच्या पोस्टरवर फोटो लावत निशाणा साधला आहे. “आम्ही सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी किंवा जनतेच्या पैशाने दक्षिण आफ्रिकेत वैयक्तिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी निवडणूक लढवत नाही. आम्ही महाराष्ट्रातील वंचित – बहुजनांच्या आकांक्षा आणि प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुका लढवतो”, असं वंचित बहुजन आघाडीने ट्विटरवर म्हटलं आहे.

“गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला कमी मतदान झालं होतं, जो पक्ष काँग्रेसच्या मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न करतो तो भाजपला मदत करतो, डॅमेज करतो त्यामुळे कोणीही निवडून येत नाही. ज्यामुळे जो विरोधात आहे, तो निवडून येतो म्हणून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नका”, असं वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी काल केलं होतं. यावरून वंचित बहुजन आघाडीने प्रणिती शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय.

वंचित बहुजन आघाडीने नेमकं काय म्हटलंय?

“ताई, तुम्ही आणि तुमच्यासारखे लोक. आम्ही सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी किंवा जनतेच्या पैशाने दक्षिण आफ्रिकेत वैयक्तिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी निवडणूक लढवत नाही. आम्ही महाराष्ट्रातील वंचित – बहुजनांच्या आकांक्षा आणि प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुका लढवतो. असो, या सर्व गोष्टी बंद करा. तुम्ही ठीक आहात? आम्हाला समजले आहे की, इतके दिवस थांबल्यानंतरही तुमचे तुमच्या पक्षासोबत जमत नाही. नवीन पक्षाचा मुहूर्त कधी आहे?”, असा खोचक सवाल वंचित बहुजन आघाडीने प्रणिती शिंदे यांना केला आहे.