अक्षय मंकनी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 24 डिसेंबर 2023 : एकीकडे महाविकास आघाडीने राज्यात ताकदीने लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीवरून मोठं भाष्य केलं आहे. महाविकास आघाडीला धक्का देणारं हे विधान असल्याची चर्चा सुरू आहे. तुम्हाला आता कठोर निर्णय घ्यावे लागतील. उद्या एकत्र येणार नसाल तर आम्ही सर्वांनी 48 च्या 48 जागा स्वबळावर लढवल्या पाहिजे. त्याही ताकदीने लढवल्या पाहिजे, असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. उद्या काय होईल ते जाऊ द्या. पण रिलिजीयस आयडेंटी तुम्ही क्रॅक करून चळवळीची आयडेंटीटी पुन्हा प्रस्थापित करता हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
साने गुरुजी यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या संविधान निर्धार सभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र ही राज्य लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. इतर राज्यात काय करता येईल माहीत नाही. पण महाराष्ट्रात बरंच काही करता येईल. मात्र विरोधक एकत्र येतील अशी परिस्थिती वाटत नाही. एकत्र येणार नसतील तर 48 जागा ताकदीने लढवू, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
यावेळी त्यांनी तुम्ही चळवळ निवडणार की कुटुंब? असा सवाल केला. तुम्ही चळवळ निवडली की कुटुंब तुरुंगात जातं. चळवळीसाठी सर्वच लालूप्रसाद यादव होत नाहीत. सगळे काही निवडणुकीत एकत्र येणार नाहीत हे आपल्याला सगळं काही माहीत आहे. ते कुटुंबाला प्राधान्य देणार आहेत. जे कुणी इथे आहेत ते कुटुंबातून येणार आहेत. कुणी चळवळीतून आले नाही आहेत, असं सांगतानाच कुणीही रिलिजीअस आयडेंटिटीला खतपाणी घालू नये, असं आवाहन त्यांनी केलं.
महाविकास आघाडीचा जागेचा फॉर्म्युला ठरला आहे. वंचितला दोन जागा सोडण्यात येणार आहे, अशा बातम्या सुरू आहेत, त्यावरही त्यांनी भाष्य केलं. माझ्याशी कोणाचीही अजूनपर्यंत चर्चा झालेली नाही. त्यामुळे हा फॉर्म्युला कोणी आणला मला माहीत नाही, असं आंबेडकर म्हणाले.
यावेळी त्यांनी संविधान निर्मितीच्या कालखंडावर भाष्य केलं. 1946 ते 1949 दरम्यान संविधान निर्मितीच्या संदर्भात चर्चा सुरू होती. आणि 26 जानेवारी 1950ला संविधान स्वीकारलं गेलं. पण काही लोकांचा हा संविधान स्वीकारायला विरोध होता. त्यावेळचे गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल यांनी तेव्हाच्या संघ प्रमुखाला तीन अटी टाकल्या होत्या. अशोक चक्र मान्य करावे लागणार, 14 नव्हे 15 ऑगस्टला स्वातंत्र दिवस मानावा लागणार, तुम्हाला संविधान मान्य करावे लागेल. पण संघाने सरदार पटेलांनी घातलेल्या या अटी मान्य केल्या नाहीत. 14 तारखेला पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस असतो. त्याच दिवशी संघाने स्वातंत्र्य दिन साजरा केला. संघ 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन मानत नाही, असं त्यांनी सांगितलं.
संविधानाची निर्धार सभा 70 वर्षांनी घ्यावी लागत आहे. याचाच अर्त समाजात अजून विचार रुळलेले नाहीत. समतावादी विचारसरणीचा लढा पुढे घेऊन जायचा आहे. नवीन भूमिका आपल्याला घ्यावी लागणार आहे. आपण नेमकं कुठे कमी पडत आहोत याचा विचार केला पाहिजे. एकेकाळी समाजवादी आणि मार्क्सवादी विचारसरणी हाइटवर होती. पण त्यांची हाईट कमी झाली. आता धर्म हा आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला आहे, असं ते म्हणाले. हे संविधान वाचवायच असेल तर घराबाहेर पडावं लागेल. नवीन संविधान आलं आहे. ज्यांना कोणाला बघायचं असेल तर त्यानी संसदेत जावं आणि बघावं, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.