‘त्यांना जुळवूनच घ्यायचं नसेल तर आमचा नाईलाज’, ‘वंचित’चा मविआला इशारा

| Updated on: Nov 15, 2023 | 5:51 PM

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. महाविकास आघाडीचं लोकसभा निवडणुकीसाठीचं संभाव्य जागावाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या वृत्तावर वंचित बहुजन आघाडीकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. वंचित आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षांनी या वृत्तावरुन महाविकास आघाडीला मोठा इशारा दिला आहे.

त्यांना जुळवूनच घ्यायचं नसेल तर आमचा नाईलाज, वंचितचा मविआला इशारा
prakash ambedkar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | 15 नोव्हेंबर 2023 : महाविकास आघाडीचं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप झाल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये लोकसभेच्या 48 जागांपैकी 44 जागांवर चर्चा पूर्ण झालीय. तर चार जागांवर चर्चा सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर सोबत आल्यास अकोल्याची जागा त्यांच्यासाठी राखीव ठेवली जाईल, अशी चर्चा महाविकास आघाडीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण या जागावाटपाच्या वृत्तावर वंचित बहुजन आघाडीकडून रोखठोक भूमिका मांडण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी महाविकास आघाडीला मोठा इशारा दिला आहे.

महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतलं नाही तर प्रकाश आंबेडकर प्रत्येक मतदारसंघात उमेदवार देऊ शकतात. त्यामुळे त्याचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनेक ठिकाणी तीन नंबरला होते. लोकसभेत वंचितच्या उमेदवारांनी 41 लाख मतदान घेतलं होतं. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला सोबत न घेणं महाविकास आघाडीला भारी पडू शकतं. विशेष म्हणजे जागावाटपाच्या बातम्यांवर सिद्धार्थ मोकळे यांनी महाविकास आघाडीला थेट इशाराच देवून टाकला आहे.

‘उगाच वेड्याचं सोंग घेऊन…’

“महाविकास आघाडीच्या 44 जागांचं वाटप झाल्याची बातमी पाहण्यात आली. 4 जागा शिल्लक असून त्यावर चर्चा सुरु असल्याचं त्या बातमीत म्हटलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि महाविकास आघाडीला आमचं सांगणं आहे की, तुम्हाला आमच्यासोबत सुरुवातीपासून जुळवून घ्यायचं नाही हे आम्हाला माहिती आहे. हे दिसतंय आणि हे लोकांनाही दिसून आलं आहे. त्यामुळे आता उगाच वेड्याचं सोंग घेऊन पेडगावला जाण्याची गरज नाहीय”, अशी टीका सिद्धार्थ मोकळे यांनी केलीय.

‘…तर आपला नाईलाज आहे’

“44 झाल्या, 4 शिल्लक आहे हे करण्यापेक्षा, तुमच्यात 48 जागांचं वाटप झालंय, अशी बातमी देऊन एकदाच मोकळं व्हा. ते तुमच्यासाठी चांगलं राहील. फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेवर विश्वास असलेल्या जनतेने आणि मतदारांनी सुद्धा या सगळ्या प्रक्रियेकडे डोळसपणे बघितलं पाहिजे. वेळ आला तर आपला लढा हा आपल्याला उभारावा लागतो, आपल्याला उभारावा लागतो. हे काही आपल्याला नवं नाही. त्यांना जुळवूनच घ्यायचं नसेल तर आपला नाईलाज आहे”, असा इशारा सिद्धार्थ मोकळे यांनी दिलाय.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या इशाऱ्यानंतर काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी याबाबतच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. “इंडिया आघाडीत अजूनपर्यंत तरी कोणत्याही जागावाटपाची चर्चा झालेली नाही. सभा असतील, पुढच्या बैठका असतील हे पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर त्याबाबत चर्चा होईल. समन्वय समिती आहे, हायकमांड आहे, वरिष्ठ नेते आहेत, या सर्व स्तरावर चर्चा होईल, कुणाकडे किती जागा दिल्या याबाबत चर्चा होणार आहे. त्यामुळे आज ज्या बातम्या सुरु आहेत त्या खोळसाडपणाच्या आहेत. आज ज्या गोष्टी घडतील त्याबाबत अधिकृत माहिती समोर येईल”, अशी प्रतिक्रिया अतुल लोंढे यांनी दिलीय.