उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात तोडफोड करणाऱ्या या महिलेचं नाव धनश्री सहस्रबुद्धे आहे. महिलेचं मानसिक संतुलन बिघडलेले असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दादरमध्ये राहणाऱ्या या महिलेच्या घरी पोलिसही जावून आले मात्र या महिलेनं दारच उघडलं नाही. या महिलेचे आणखी काही व्हिडीओ सुद्धा समोर आलेत. ज्यात झाडूनं ही महिला सीसीटीव्ही कॅमेराला मारताना दिसतेय. तर दारावरही झाडून मारत असल्याचं दिसतेय. पास असल्याशिवाय मंत्रालयात कोणालाही एंट्री नसते. मात्र ही महिला पास शिवाय मंत्रालयात शिरली आणि थेट 6 व्या मजल्यावरही आली. त्यामुळं मंत्रालयाच्या सुरक्षेत चूक झाल्यानं, आता सुरक्षा रक्षकांवर कारवाई होणार आहे. मात्र विरोधकांनी लाडकी बहीण चिडल्याची टीका फडणवीसांवर केली आहे.
महिला मानसिक आजारी असल्यानं, पोलिसांनीही कुठलीही जबरदस्ती न करता, तिथून निघून गेलेत..मात्र मनसेच्या नेते संदीप देशपांडेंनीही, काही दिवसांआधी ती महिला मनसेच्या कार्यालयात आली होती अशी माहिती दिली आहे.
मंत्रालयात ज्या पद्धतीनं बेकायदेशीरपणे घुसखोरी झाली आणि त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालायत तोडफोडी झाली, ही बाब गंभीरच आहे. पोलिसांनी गेटवरच रोखलं असतं तर, या महिलेला 6 व्या माळ्यावर जाता आलं नसतं..त्यामुळं नेमकी कशी चूक झाली हेही शोधलं जातं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात झालेली तोडफोड वरुन भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे. हे षडयंत्र तर नाही ना? अशी शंका चित्रा वाघ यांनी उपस्थित केली आहे. महिलेच्या मागणे नेमके कोण आहे, हे उघड व्हायलाच हवं. महिलेची मानसिक स्थिती तपासावी अशी मागणी त्यांनी केलीये.
गुरुवारी एक महिला पास न काढताच गेटमधून मंत्रालयात घुसली. ही महिला सचिव गेटमधून विनापास मंत्रालयात आली. पुढे ती थेट देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात पोहचली. तिथे घोषणाबाजी करत तिने तोडफोड केली. फडणवीस यांच्या नावाचा नामफलकही तिने काढून फेकला.