मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : वंदेभारत एक्सप्रेसची लोकप्रियता पाहून नॉन एसी कोचच्या वंदेभारत साधारण एक्सप्रेस ( Vande Bharat Express sadharan ) लवकरच चालविण्याची योजना भारतीय रेल्वेने आखली आहे. या नॉन एसी स्लिपर कोच असलेल्या ट्रेनला पुश-पुल इंजिन जोडण्यात आले आहे, त्यामुळे घाट सेक्शनमध्ये इंजिन बदलण्याचा त्रास वाचणार आहे. मुंबईच्या वाडी बंदर यार्डात ही ट्रेन चाचणी नुकतीच आणण्यात आली आहे. येत्या काही दिवसात या ट्रेनची चाचणी होणार आहे. 22 कोचच्या नॉन एसी 3 टीयर स्लीपर ट्रेनचे भाडे कमी असणार आहे. या ट्रेनची प्रवासी क्षमता 1,800 प्रवासी इतकी असून तिला दोन इंजिन लावण्यात येणार आहेत. या ट्रेनचा वेग दर ताशी 130 किमी प्रति तास इतका असणार आहे.
वंदेभारत एक्सप्रेस देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन असून ती सध्या देशातील 34 मार्गांवर चालविण्यात येत आहे. या ट्रेनची स्लिपर व्हर्जन अजून तयार झाली नसून त्याची निर्मिती चेन्नईच्या आयसीएफ कारखान्यात होत आहे. ही वंदेभारत स्लिपर ट्रेन एप्रिल 2024 पर्यंत रुळावर येऊ शकते. त्या दरम्यान प्रवाशांनी कमी खर्चात आरामदायी प्रवास घडविण्यासाठी वंदेभारत साधारण एक्सप्रेस तयार करण्यात आली आहे. या ट्रेनची चाचणी मुंबई – नाशिक कॉरिडॉरवर होण्याची शक्यता असल्याचे टाईम्सच्या बातमीत म्हटले आहे. त्यामुळे घाटात ही ट्रेन चालण्यासाठी दोन पुश-पुल इंजिन जोडण्यात आली आहेत. तसेच मुंबई ते दिल्ली मार्गावर ही ट्रेन चालविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अद्याप यासंदर्भात रेल्वेने अद्याप काहीही अधिकृत स्पष्ट केलेले नाही.
रेल्वे बोर्डाचे सचिव मिलिंद देऊस्कर यांनी 12 ऑक्टोबर रोजी सांगितले की भारतीय रेल्वे वंदेभारत स्लिपर कोच आणि वंदेभारत मेट्रो लॉंच करण्याची योजना आखत आहे. सीआयआय रेल्वे परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की आम्ही प्रवाशांची वेळ वाचविणे आणि त्यांना आरामदायी सुविधा देण्यासाठी वंदेभारत स्लिपर आणि वंदेभारत मेट्रो ट्रेनची योजना आखली आहे.
यापूर्वी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील कॉन्सेप्ट ट्रेन-वंदे भारत ( स्लीपर व्हर्जन ) ची छायाचित्रे शेअर केली आहे. प्रत्येक वंदेभारत स्लीपर ट्रेनला दर ताशी 160 किमी वेगासाठी डिझाईन केले आहे. यात 16 कोच असणार आहेत. ज्यात 887 प्रवासी बसू शकणार आहेत. भारतीय रेल्वेने 102 वंदेभारत तयार करण्याची योजना आखली आहे. साल 2022-23 मध्ये 35 आणि 2023-24 मध्ये 67 वंदेभारतची निर्मिती करण्याची योजना आखली आहे. इंटेग्रल कोच फॅक्ट्री, रेल कोच फॅक्ट्री आणि मॉर्डन कोच फॅक्ट्रीमध्ये वंदेभारतची निर्मिती होणार आहे. यातील 75 वंदेभारत चेअर कार व्हर्जन तर उर्वरित स्लीपर व्हर्जन वंदेभारत असणार आहेत. भारतीय रेल्वेने वेगवेगळ्या तंत्राच्या 400 वंदे भारत ट्रेन ( स्लीपर व्हर्जन ) निर्मितीची प्रक्रीया सुरु केली आहे.