मुंबई | 15 मार्च 2024 : वंदे भारत एक्स्प्रेस देशात सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. आता देशात शंभर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाल्या आहेत. सेमीहायस्पीड असलेली ही ट्रेन सुरु करण्याबाबत सर्वत्र मागणी वाढत आहे. यामुळे १२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वंदे भारत एक्स्प्रेस सुरु केल्या. महाराष्ट्रातून गांधीनगर, अहमदाबाद, सोलापूर, शिर्डी, मडगाव, जालना या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. या गाड्यांमध्ये आता एक बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे पाण्याची आणि पैशांची बचत होणार आहे. आता वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये एका लिटरऐवजी अर्ध्या लिटरच्या पाण्याची बाटली मिळणार आहे.
महाराष्ट्रातून धावणाऱ्या सर्व वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये रेलनीर ही पाण्याची बाटली दिली जाते. ‘रेलनीर’ हा भारतीय रेल्वेचा बाटली बंद पाण्याचा ब्रँड आहे. मात्र ‘रेलनीर’ची बाटली एक लिटरची असल्याने ती खरेदी करणे आणि रेल्वे प्रवासात बाळगणे प्रवाशांना त्रासदायक होत होते. यामुळे अर्धा लिटर म्हणजेच ५०० मिलीची बाटलीबंद पाणी पुरवण्याची मागणी प्रवाशांकडून केली होती. तसेच रेल्वे प्रवासात अनेक प्रवासी एक लिटर बाटलीमधील काहीसे पाणी पिऊन उर्वरित पाणी फेकून देत होते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत होता. त्यामुळे वंदे भारतमध्ये आता एक लिटरऐवजी अर्ध्या लिटरच्या पाण्याची बाटली मिळणार आहे.
रेलनीलच्या एक लिटर पाण्याची बाटलीऐवजी अर्धा लिटरची बाटली दिली जाणार आहे. त्यामुळे मुंबईतून सुटणाऱ्या गांधीनगर, अहमदाबाद, सोलापूर, शिर्डी, मडगाव, जालना या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांसाठी ५०० मिलीची पाण्याची बाटली उपलब्ध असेल. या निर्णयामुळे प्रवाशांची मागणी पूर्ण होणार आहे. तसेच पाण्याची बचत होणार आहे.
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये तिकीटासोबत फूड घेतल्यास त्याचे वेगवेगळे चार्जस आहेत. 65 पासून ते 350 रुपायांपर्यंत चार्ज त्यासाठी आकारला जातो. वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये चहाचे दर 15 रुपये आहेत.