महागाईने सर्वसामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. या दरवाढीने सर्वसामान्य हवालदिल झाले आहेत. मुंबई, पुणे, नागपूरच नाही तर राज्यातील अनेक भागातील बाजारात भाजीपाला महागला आहे. वाढलेल्या दराने ग्राहकांच्या खरेदीवर मोठा परिणाम झाला. ग्राहकांची खरेदी एक किलोवरुन अर्ध्या किलोवर आली आहे. सर्वसामान्य ग्राहकांचे किचन बजेट कोलमडले आहे.
वातावरण बदलाचा मोठा फटका
गेल्या पंधरवड्यापासून पूर्वमोसमी पाऊस, वातावरणातील बदलामुळे भाजीपाला उत्पादनाला फटका बसला. राज्यातील काही भागात मध्यंतरी पूर्वमोसमी पाऊस झाला. विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला. यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन कमी होऊन दरवाढ झाली. बाजारातील भाजीपाल्याची आवक कमी झाली. पालेभाज्या व फळभाजांची दरवाढ झाली. सध्या गवार, चवळी व वालशेंगा १०० रुपये, टोमॅटो ६० रुपये, गवार १०० रुपये, तर मेथी १२० रुपये किलोवर पोहोचली आहे. सर्वाधिक २०० रुपये किलो दर कोथंबीरला मिळत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर भाजीपाला कडाडल्याने महिलांचे बजेट कोलमडले आहे.
भाजीपाल्याचे दर गगनाला
पावसाळ्यामुळे आता भाजीपाल्याचे दर गगनाला पोहोचले आहे. राज्यातील अनेक भागात स्वयंपाकात लागणारी कोथिंबीर व मिरची थेट शंभर रुपये किलोवर गेले आहेत. तसेच टोमॅटोही 60 रुपये किलोने मिळत आहे. सध्या बाजारात मिरची व कोथंबीर 90 ते 100 रुपये किलोवर गेले आहे.टोमॅटो 60 रुपये किलो, गिलके 80 रुपये, बटाटे 40 रुपये, वांगी 80 रुपये, भेंडी 90 रुपये, कारले 60 रुपये, पलकोबी 80 रुपये, शिमला मिरची 80 रुपये, दुधी भोपळा 60 रुपये, कोबी 60 रुपये, कैरी 70 रुपये दराने विक्री होत आहे.
बजेट बिघडले
गेल्या पंधरवड्यात झालेल्या वादळासह अवकाळी पावसाने भाजीपाला उत्पादनात घट झाली आहे. उत्पादनात घट झाल्याने गेल्या आठवडाभरापासून भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरात २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. अवकाळी पावसाने पिकांना चांगले झोडपून काढल्याने कोथिबीर जागेवरच खराब झाली.
जून महिना अखेर किंवा जुलै च्या पहिल्या आठवड्या पर्यंत भाज्यांचे भाव असेच असतील अशी माहिती विक्रेत्यांनी दिली त्यामुळे सामान्य ग्राहकांना अजून काही दिवस वाढत्या किमतीत भाजी खरेदी करावी लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे घरातील बजेट बिघडले आहे.