अक्षय मंकनी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 24 डिसेंबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 20 जानेवारीपासून अमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. मुंबईच्या आझाद मैदान आणि शिवाजी पार्कात हे आंदोलन सुरू होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी मराठा आंदोलकांनी तयारी सुरू केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्यावेळी राज्यभरातील मराठा समाज हा मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या उपोषणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. मनोज जरांगे यांचं उपोषणाच्या काळातच अयोध्येत राम मंदिराची प्रतिष्ठापना होणार आहे. मात्र, जरांगे हेच आमचे राम आहेत, असं सांगत मराठा आंदोलकांनी मुंबईत येण्याचा निर्धार घेतला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मनोज जरंगे पाटील यांनी आता 20 जानेवारीला मुंबईत येऊन आमरण उपोषण करणार आहेत. त्यांनी त्यांचा भाषणात दादर शिवाजी पार्क आणि आझाद मैदान या दोन्ही मैदानाचा उल्लेख केला आहे. पण दादरचं शिवाजी पार्क मैदान हे ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानावर अनेक दिग्गजांच्या सभा झाल्या आहेत. त्यामुळे या मैदानात 20 जानेवारी आमरण उपोषण व्हावं याकरता मराठा समाजाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे.
या मैदानात 6 डिसेंबर रोजी मोठी व्यवस्था करण्यात येते. त्यामुळे त्याचा सेटअप हा पालिकेकडे तयार असतो. या मैदानाच्या संदर्भात आम्ही पोलिसांशी प्राथमिक चर्चा केली आहे. पण पालिकेशी अजून काही चर्चा झाली नाही. पण आंदोलनासाठी शिवाजी पार्क मैदान उत्तम आहे. 21 तारखेला मुंबई मॅरेथॉन आहे आणि 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच उद्घाटन आहे. या कार्यक्रमात मराठा बांधवांकडून कोणत्याही पद्धतीचा अडसर होणार नाही. आम्ही तर 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाला जाऊ शकत नाही. कारण आमचा राम (मानोज जरंगे पाटील) हे आमच्या सोबत असणार आहेत, असं वीरेंद्र पवार म्हणाले.
आम्ही शांततेत आमरण उपोषण करणार आहोत. आम्ही कुठेही गालबोट लावणार नाही. आम्ही रक्षणकर्ते आहोत. कुठलीही हिंसा होणार नाही. 20 जानेवारीला जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण होणार आहे. त्याची जय्यत तयारी आम्ही करत आहोत. यापूर्वीही आम्ही मुंबईत आंदोलन केलं होतं. त्याची दखल जगाने घेतलेली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर बोलण्यास नकार दिला. छगन भुजबळ हे खूप मोठे नेते आहेत. त्यांच्याविषयी बोलावं इतका मी मोठा नाही, असं सांगतानाच सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पीटिशन दाखल झाली आहे. ही दिलासादायक बाब आहे. पण आम्हाला 50% च्या आतील ओबीसी आरक्षण हवं आहे आणि तेही टिकणारं आरक्षण हवं आहे, असंही ते म्हणाले.