मुंबईतल्या क्रिकेट प्रेमींसाठी आजपेक्षा मोठा दिवस कोणताच असू शकत नाही. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकणं हा एक तप आहे, एक स्वप्न आहे, कोट्यवधी भारतीयांचं हे स्वप्न होतं. हे स्वप्न भारतीय क्रिकेट संघाने साकार करुन दाखवलं आहे. त्यामुळे या विश्वविजेत्या टीमची भव्य विजयी मिरवणूक ही मुंबईत काढण्यात आली आहे. टीम इंडियाची मुंबईत नरिमन पॉईंट पासून अतिशय भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आहे. ही मिरवणूक मुंबईतील वानखेडे स्टेडियमपर्यंत असणार आहे. यानंतर वानखेडे स्टेडियमवर भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचं साक्षीदार होण्याचं मोठं भाग्य सर्व मुंबईकरांना मिळालं आहे. लाखो क्रिकेट चाहते प्रत्यक्षपणे नरिमन पॉईंट परिसर, मरीन ड्राईव्हच्या रस्त्यावर आणि वानखेडे स्टेडियमवर दाखल झाले आहेत. तर अनेक जण वानखेडे स्टेडियमच्या दिशेला रवाना झाले आहेत. अनेक जण टीव्ही आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होत आहेत.
मुंबईतील लाखो क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा क्षण हा अतिशय भावनिक आहे. अनेक चाहत्यांनी अनेक क्रिकेट सामने हे वानखेडे स्टेडियममध्ये पाहिले आहेत. पण आजचा दिवस वेगळा आहे. वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाची भव्य मिरवणूक मुंबईत निघाली आहे. या मिरवणुकीसाठी जिथे पाहावं तिथे गर्दी बघायला मिळत आहे. आपल्या आवडत्या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी लाखो चाहते या ठिकाणी आले आहेत. चाहत्यांकडून जोरदार सेलीब्रेशन सुरु आहे.
मुंबई विमानतळावर दाखल होताच टीम इंडियाचं केक कापून स्वागत करण्यात आलं. टीम इंडियाचं विमान मुंबई विमानतळावर दाखल होताच विमानतळावरील अग्निशमन दलाकडून पाण्याच्या वर्षावाने स्वागत करण्यात आलं. तसेच कॅप्टन आणि क्रू मेंबर्सकडून देखील रोहित शर्मा आणि त्याच्या टीमचं स्वागत करण्यात आलं. दुसरीकडे लाखोंचा जनसागर मरीन ड्राईव्हवर टीम इंडियाची वाट पाहत आहे.