मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट, पुणे शहरातील काय आहे परिस्थिती

| Updated on: Feb 26, 2024 | 7:17 AM

Mumbai, Pune Water | मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती. त्या बैठकीत पाण्याची परिस्थिती पाहून फेब्रुवारीमध्ये निर्णय घेण्याचे ठरले होते. सध्या पुणेकरांवर पाणी टंचाईचे संकट नाही. परंतु मुंबईकरांची परिस्थिती अवघड आहे.

मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट, पुणे शहरातील काय आहे परिस्थिती
mumbai dam
Follow us on

विजय गायकवाड, मुंबई, पुणे, दि. 25 फेब्रुवारी 2024 | राज्यात यंदा मॉन्सूनने सरासरी गाठली नाही. त्यामुळे मार्च महिना सुरु होण्यापूर्वी त्याचा फटका बसू लागला आहे. मुंबईकरांवर पाणी टंचाईचे संकट आले आहे. मुंबईत 1 मार्चपासून 10 टक्के पाणी कपात होण्याची शक्यता आहे. मुंबईची तहान भागविणाऱ्या 7 ही धरणात केवळ 45.43 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या तीन वर्षांतील हा सर्वात कमी पाणीसाठा आहे. आता हा पाणीसाठा पावसाळ्यापर्यंत पुरणारा नाही. यामुळे पाणी कपात होणार आहे. परंतु पुणे शहराला दिलासा देणारा निर्णय झाला आहे. कालवा समितीच्या बैठकीत पाणी कपात न करण्याचा निर्णय झाला आहे.

काय आहे मुंबईतील परिस्थिती

मुंबईतील परिस्थितीमुळे भातसा आणि उधर्व वैतरणा धरणातील राखीव साठ्यातील पाणी मिळावे यासाठी पालिकेने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला. मात्र 10 दिवसानंतर ही उत्तर न आल्याने पाणी कपातीचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. उधर्व, वैतरणा, मोडक सागर, तानसा, वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणातून मुंबईला पाणी पुरवठा होतो. मात्र या सात धरणात केवळ 6 लाख 57 हजार 536 दशलक्ष लिटर म्हणजेच 45.43 एवढा पाणीसाठा आहे. यामुळे पाणी कपातीचा निर्णय पालिकेने घेतला असल्याची माहीती आहे.

पुणेकरांनो पाणी जपून वापरा

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात केवळ 55 टक्के इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे आता खडकवासला प्रकल्पातील सर्व धरणे आणि इतर पाणी साठ्यात मिळून पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यात येणार आहे. शनिवारी कालवा समितीच्या बैठकीत १५ जुलैपर्यंत पुरेल इतके पाणी राखून ठेवण्याचा निर्णय झाला. यामुळे पुणे शहरासाठी आता ७.४ टीएमसी पाणी उपलब्ध झाले आहे. या निर्णयामुळे पुणेकरांवर असणारे पाणीकपातीचे संकट टळले आहे.

हे सुद्धा वाचा

बचत केली संकट टळले

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती. त्या बैठकीत पाण्याची परिस्थिती पाहून फेब्रुवारीमध्ये निर्णय घेण्याचे ठरले होते. तोपर्यंत पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर जलसंपदा विभागासह महापालिका प्रशासनाने पाणी बचतीचे उपाय सुरु केले. पाणी बचत केल्यामुळे पुणेकरांवर पाणी टंचाईचे संकट आले नाही.