दाणादाण! मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; सखल भागात पाणी भरले, रस्तेही पाण्याखाली!

| Updated on: Jun 12, 2021 | 10:48 AM

काल दिवसभर रिमझिम कोसळणाऱ्या पावसाने आज सकाळपासूनच जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईला (Mumbai and thane) पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे.

दाणादाण! मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; सखल भागात पाणी भरले, रस्तेही पाण्याखाली!
फोटो प्रातनिधिक
Follow us on

मुंबई: काल दिवसभर रिमझिम कोसळणाऱ्या पावसाने आज सकाळपासूनच जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी भरले असून रेल्वे रुळावरही पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. (Waterlogging in parts of Mumbai due to heavy downpour)

सकाळपासून मुंबईत धुँवाधार पावसाने सुरुवात केली. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पावसाचे पाणी भरले. सायन पुलाखाली प्रचंड पाणी साचले आहे. तसेच सायनपासून ठाण्याकडे जाणारे रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. सायन, दादर, कुर्ला, चुनाभट्टी, धारावी आणि चेंबूर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या ठिकाणी राहणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अंधेरी फाटक आणि सबवेमध्ये पावसाचे पाणी भरले आहे. या भागात गुडघ्यापर्यंत पाणी आल्याने गाड्यांमध्येही पाणी शिरताना दिसत आहे. अंधेरी सबवेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलीस तैनात ठेवण्यात आले आहेत. तसेच बीकेसी कोविड सेंटर येथेही गुडघाभर पाणी साचले आहे. हा संपूर्ण परिसर जलमय झाल्याने नागरिकांना घाणेरड्या पाण्यातूनच लसीकरणासाठी जावं लागत आहे.

नवी मुंबईत दाणादाण

नवी मुंबईतही रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे कोपरखैरणे येथील राम सोसायटीत काल रात्री झाड पडल्याने 4 ते 5 गाड्यांचे नुकसान झाले आहे. काल रात्री 12 च्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

ठाण्यात रात्रीपासूनच दमदार हजेरी

पावसाने सलग तीन दिवसापासून ठाण्याला झोडपून काढले आहे. काल रात्रीपासून पावसाने अधिकच जोर धरल्याने ठाण्यातील सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईला जाणारी वाहतूक मंदावली आहे. अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान खात्याने दिला असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

वसई, विरार, नालासोपाऱ्यात रस्ते पाण्याखाली

वसई, विरार आणि नालासोपाऱ्यात रात्रभरापासून पाऊस कोसळत असल्याने शहरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तसेच सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. नालासोपारा पूर्व, आचोळे रोड, सेंट्रल पार्क, धानीव बाग, टाकी पाडा, वसईतील गोलानी नाका, एव्हरशाईन, वसंत नगरी सर्कल, गोकुळ सोसायटी, समता नगर, जे बी नगर, विरार पश्चिम, विवा कॉलेज रोड आदी ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. गोकुळ सोसायटीत तर गुडघाभर पाणी साचले असून सोसायटीच्या इलेक्ट्रिक बोर्डपर्यंत पाणी आलं आहे. वसई-नालासोपाऱ्यात आज दिवसभरात पावसाचा जोर कायम राहिला तर हाहा:कार माजू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे

पालघरमध्ये विजाांचा कडकडाट

पालघरमध्येही सकाळापासूनच ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. पालघरच्या पूर्वपट्ट्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पालघर, मनोर, बोईसर, डहाणू, कासा, विक्रमगड, वाडा परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तर दमदार पावसामुळे शेतकरी सुखावला असून भात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. येत्या 15 तारखेपर्यंत हवामान विभागाने पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

चार दिवस धोक्याचे

दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वारे वाहणार आहेत. त्याचा परिणाम म्हणून पुढील चार ते पाच दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत चार दिवस रेड अॅलर्ट घोषित करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाण्यासाठी रविवारी रेड अॅलर्ट जारी करण्यात आल्याचं मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसळीकर यांनी सांगितलं. (Waterlogging in parts of Mumbai due to heavy downpour)

 

संबंधित बातम्या:

तुम्ही मुंबईवरुन पुण्याला ई-पासशिवाय जाऊ शकताय? पाहा महाराष्ट्राचा लेव्हलवाईज अनलॉक प्लॅन…

Mumbai Rain Live Updates | मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात, सायन पुलाखाली पाणी साचलं

मोठी बातमी: येत्या 4 तासांत मुंबई,ठाणे, रायगडात अतिवृष्टीची शक्यता; सिंधुदुर्गात ढगफुटीचा इशारा

(Waterlogging in parts of Mumbai due to heavy downpour)