‘मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला….”, छगन भुजबळ नेमके काय म्हणाले?

| Updated on: Nov 24, 2024 | 3:00 PM

विधिमंडळाचा नेता म्हणून आम्ही अजित पवार यांची निवड केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि भाजपचे नेते कोण ते आता निश्चित होणार आहे. मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आमचा विरोध असण्याचे कारण नाही.

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला...., छगन भुजबळ नेमके काय म्हणाले?
छगन भुजबळ
Follow us on

महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांची नेतेपदी निवड करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी दिली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर कोपरखळी मारली. मला पाडण्याचा त्यांना खूप प्रयत्न केला पण जनतेने साथ दिली, असे भुजबळ म्हणाले. मुख्यमंत्रीपदाबाबतही त्यांनी आपले मत व्यक्त केले.

काय म्हणाले भुजबळ

विजयाबद्दल बोलताना भुजबळ म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळी जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला गेलो होता, तो दूर करण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिन्ही नेत्यांनी केले. तसेच महायुतीच्या यशात लाडक्या बहिणींचा वाटा मोठा आहे. लाडक्या बहिणांना सरकारने वेळेवर पैसे दिले. यामुळे लाडक्या बहिणांना खात्री पटली. पर्यायाने जनतेने मोठ्या प्रमाणावर विश्वास टाकला. यावेळी महिलांचे मतदान इतर निवडणुकीपेक्षा जास्त झाले. ज्या वेळी महिला मतदान करतात त्यावेळी त्या घरातील पुरुषही तेच मतदान करतात, हे सूत्र आहे. त्याचा फायदा झाला.

मनोज जरांगे म्हणाले पण…

पवार साहेबांनी माझ्या मतदार संघात मला पाडण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांच्या पक्षाचा उमेदवार माझ्याविरोधात उभे होते, त्यामुळे त्यांचे ते करणे साहजिक आहे. परंतु माझे मित्र मनोज जरांगे पाटील म्हणाले होते, मी या निवडणुकीत पाहणार नाही. बोलणार नाही. माझा कोणाला पाठिंबा नाही. पण प्रचार संपल्याच्या एकादिवसापूर्वी त्यांनी मराठा समाजाला मला पाडण्याचे सांगितले. त्याचा परिणाम माझ्या मताधिक्यावर नक्कीच झाला. परंतु त्यामुळे इतर अल्पसंख्याक समाज एकत्र आले आणि मला निवडून दिले. मराठा समाजही महायुतीच्या पाठिशी राहिल्याचे दिसत आहे. मनोज जरांगे यांनी सतत देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांना पाडा, असे सातत्याने सांगितले. परंतु जनतेने त्यांचे ऐकले नाही.

हे सुद्धा वाचा

देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला…

विधिमंडळाचा नेता म्हणून आम्ही अजित पवार यांची निवड केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि भाजपचे नेते कोण ते आता निश्चित होणार आहे. मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आमचा विरोध असण्याचे कारण नाही. आता राज्यपाल आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी बोलवतील. त्यानंतर मुख्यमंत्रीपद आणि मंत्रिपदाचे वाटप होईल, असे भुजबळ म्हणाले.