सर्वात मोठी बातमी! आम्ही महापालिका निवडणुकांना तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान

| Updated on: Feb 13, 2023 | 1:51 PM

आमदारांच्या पात्र-अपात्रतेवरही त्यांनी भाष्य केलं. कोर्ट ठरवतं अपात्रतेचा निर्णय द्यावा की नाही. काही लोक फुकटचे सल्ले देतात. ते देऊ द्या. आपल्या मनावर नसतं. न्याय व्यवस्था सर्वोच्च आहे.

सर्वात मोठी बातमी! आम्ही महापालिका निवडणुकांना तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राज्य सरकार कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने शिंदे-फडणवीस सरकारकडून महापालिकेच्या निवडणुका टाळल्या जात आहेत, असा आरोप विरोधकांकडून वारंवार केला जात आहे. विरोधकांच्या या आरोपाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतला आहे. निवडणुकीची केस कोर्टात पेंडिंग आहे. आमच्या हातात काहीच नाही. पण आम्ही महापालिका निवडणुकांसाठी कधीही तयार आहोत. आम्ही निवडणुका टाळत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

टीव्ही 9 मराठीने महाराष्ट्राचा महासंकल्प हा कार्यक्रम आयोजित केला आहे. दादरच्या वीर सावरकर सभागृहात हा कार्यक्रम सुरू आहे. यावेळी टीव्ही9चे संपादक उमेश कुमावत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुलाखत घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

काही लोक तर सर्वोच्च न्यायालयाला सल्ला देत आहेत. आधी हायकोर्टाला देतच होते. खरं तर निवडणुकांचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. कधीही निवडणुका घेण्यासाठी आम्ही तर तयार आहोत. हे चारपाच महिन्यात एवढं करू शकतात. यांना संधी दिली तर काय करू शकतील, हे लोकांना कळून चुकलं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

निवडणुका डोळ्यासमोर नाही

मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे. ते तसंच ठेवायचं का? खड्डे तसेच ठेवले तर तुम्हीच म्हणाल हा मुख्यमंत्री होऊनपण काहीच करू शकला नाही. हा फेल झाला. त्यामुळेच आम्ही सत्तेत येताच मुंबईला खड्ड्यांपासून मुक्ती देण्याचा निर्णय घेतला. आम्ही ही चूक केली का? सत्तेत आल्याबरोबर मुंबईचं काय काय करता येईल याचा आम्ही आढावा घेतला.

आम्ही सत्तेत आलो तेव्हा निवडणुका होत्या का? नव्हत्या. आम्ही डोळ्यासमोर निवडणुका ठेवत नाही. लोकं ठरवतात कोण कामाचं आणि कोण बिनकामाचा. पण आम्ही काम करत राहणार, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मेरीटवर निर्णय व्हावा

यावेळी त्यांनी राज्यातील सत्ता संघर्षावरही भाष्य केलं. उद्यापासून सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षावर सुनावणी होणार आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्हाला भीती वगैरे काही नाही. आपलं सरकार कायद्याद्वारे स्थापित झालं आहे. या देशाला घटना आहे. नियम आहे. बहुमताला महत्त्व आहे.

आमच्याकडे 50 आमदार आणि 13 खासदार आहेत. त्यांची मतांची टक्केवारी ही 13 टक्क्यांपेक्षा जास्त होते. आमचं सरकार मेरीटवर आणि नियमाने तयार झालेलं सरकार आहे. कोर्ट पुरावे आणि वस्तुस्थिती बघतं. आमच्याकडे मेजॉरिटी आहे. त्यामुळे मेरिटवर निर्णय व्हावा ही अपेक्षा आहे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

आम्हाला टेन्शन नाही

कोर्टात आमचीच केस मजबूत आहे, असा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. आम्हाला टेन्शन नाही. ज्यांना चिंता तेच सांगतात मजबूत आहे. मजबूत आहे. मी कधीच कोर्टाच्या प्रश्नावर कधीच उत्तरदेत नाही. शेवटी तो कोर्टाचा निर्णय आहे. त्यांनी मेरीट पाहावं एवढीच अपेक्षा आहे. आम्हाला कुणाला सल्ला द्यायचा नाही, असंही ते म्हणाले.

न्याय व्यवस्था सर्वोच्च

आमदारांच्या पात्र-अपात्रतेवरही त्यांनी भाष्य केलं. कोर्ट ठरवतं अपात्रतेचा निर्णय द्यावा की नाही. काही लोक फुकटचे सल्ले देतात. ते देऊ द्या. आपल्या मनावर नसतं. न्याय व्यवस्था सर्वोच्च आहे. आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, असंही ते म्हणाले.

म्हणून निर्णय घेतला

मी मुख्यमंत्री होईल का तेही माहीत नव्हतं. आमचं भवितव्य धोक्यात आलं असं आमदारांनी सांगितलं. सोबत असलेले पक्षाचे लोकं येतात, आमचाच आमदार होणार, आमचाच मुख्यमंत्री होणार असं सांगतात, असं मला आमदारांनी सांगितलं. आम्ही खडड्यात चाललो, असंही आमदार म्हणाले. म्हणून आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती त्यांनी दिली.