गोविंद ठाकूर, मुंबई | 5 नोव्हेंबर 2023 : मुंबईकरांना लोकल प्रवासाचा चांगला अनुभव मिळणार आहे. घामाघूम होणार मुंबईकरांचा प्रवास गारगार होणार आहे. पश्चिम रेल्वेने 6 नोव्हेंबरपासून आणखी 17 एसी ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वातानुकूलित रेल्वेतून मुंबईकरांचा प्रवास होणार आहे. पश्चिम रेल्वे 6 नोव्हेंबरपासून आणखी 17 एसी ट्रेन सुरु करणार असल्यामुळे एकूण ट्रेनची संख्या 96 वर जाणार आहे. तसेच मध्य रेल्वे मार्गावर आणखी 10 एसी लोकल ट्रेन सुरु होणार आहे. ही लोकल ट्रेन सीएसटीएम ते कल्याण, बदलापूर, टिटवाळा दरम्यान धावणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नवीन एसी ट्रेन चर्चगेट ते विरार दरम्यान धावणार आहे.
पश्चिम रेल्वे 6 नोव्हेंबरपासून आणखी 17 एसी कंडिशन ट्रेन सेवा सुरू करणार आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये 31 एसी लोकल धावत होत्या. आता ही संख्या 96 वर जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली. नवीन एसी रेल्वेमुळे प्रवाशांना चांगलाच फायदा होणार आहे. आरामदायक प्रवासाचा अनुभव त्यामुळे मुंबईकरांना मिळणार आहे.