लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने; चाकरमान्यांचे हाल

| Updated on: Jul 13, 2023 | 8:26 AM

ऐन गर्दीच्या आणि कामाच्यावेळी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक तब्बल अर्धा तास उशिराने धावत आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल होत आहेत.

लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने; चाकरमान्यांचे हाल
Railway Local
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : ऐन गर्दीच्या आणि कामाच्यावेळी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक तब्बल अर्धा तास उशिराने धावत आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल होत आहेत. रेल्वेचा खोळंबा आणि पावसाची रिपरिप यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत. दरम्यान, पश्चिम रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी लोकलमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचं काम युद्ध पातळीवर हाती घेतलं असून लवकरच ही वाहतूक पूर्ववत केली जाणार असल्याचं म्हटलं आहे.

आज सकाळी पावणे सातच्या सुमारास बोरिवली येथे लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्या 35 ते 40 मिनिटे उशिराने धावत आहेत. बोरिवली ते चर्चगेटकडे जाणाऱ्या या लोकलवर तांत्रिक बिघाडाचा परिणाम झाला आहे. फास्ट आणि स्लो या दोन्ही लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत. तांत्रिक अडचणीमुळे ट्रेन उशिराने धावत असल्याची माहिती मिळत आहे. लोकल ट्रेन उशिराने धावल्याने प्रवासी नाराज झाले आहेत. बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ पॉईंट बिघाड झाला होता, त्यामुळे ट्रेन 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत होती. सध्या ती दुरुस्त करण्यात आली आहे, असं पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याचं म्हणणं आहे.

हे सुद्धा वाचा

स्थानकांवर तुफान गर्दी

दरम्यान, पश्चिम रेल्वेच्या गाड्या सुमारे 40 मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला. सकाळी सकाळीच लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने चाकरमान्यांना कामावर जायला उशिर झाला. गाड्या लेट झाल्याने पश्चिम रेल्वेवरील प्रत्येक स्थानकावर तुफान गर्दी झाली होती. त्यातच पावसाची रिपरिप सुरू झाल्याने या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले होते. तर गर्दीतून प्रवास टाळण्यासाठी अनेकांनी बस आणि टॅक्सीतून प्रवास करणं पसंत केलं.

प्रवाशांच्या गोंधळाची दखल

बोरिवली स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनीही तात्काळ तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरू केला. तब्बल तासाभरानंतर हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. सध्या लोकल सेवा सुरू असून अजूनही 10 ते 15 मिनिटे लोकल उशिराने सुरू आहे. त्यामुळे लोकलमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे. या गर्दीतूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत असून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.