Raj Thackeray exclusive Interview: विधानसभेच्या 2019 निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत युती होती. त्यावेळी ‘मातोश्री’च्या बंद खोलीत मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा झाली. शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली होती. त्या चर्चेत शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिल्याचे उद्धव ठाकरे सांगतात. परंतु भाजपकडून असे कोणतेही आश्वासन दिले गेले नसल्याचे सांगण्यात येते. आता राज ठाकरे यांनी त्या बंद दाराआड काय झाले असेल ते त्यानंतरच्या घडामोडींचा उल्लेख करत सांगितले. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत राज ठाकरे यांनी ते ‘राज’ सांगितले.
बंद खोलीत काय झाले होते, त्याबाबत भाजप बोलण्याच्या आधी मी बोललो होतो, असे राज ठाकरे म्हणाले. त्या बंद खोलीतील चर्चेबाबत तीन-चार वर्षापूर्वी झालेल्या सभेत मी बोललो होतो. त्या सभेत नरेंद्र मोदी यांच्या सभेचा उल्लेख करत सर्व सांगितले होते. नरेंद्र मोदी यांच्या त्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे व्यासपीठावर बसले होते. त्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री असतील, असे नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यानंतर अमित शाह हेच म्हणाले. मग उद्धव ठाकरे यांना जर आश्वासन दिले असेल तर त्यांनी त्या वक्तव्यांबाबत आक्षेप का घेतला नाही. तुमचे म्हणणे अडीच वर्षाचे ठरले होते तर मग आक्षेप का घेतला नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
प्रचाराच्यासभेतच उद्धव ठाकरे यांनी आक्षेप का नाही घेतला. त्यांच्या तर्काला काही अर्थ नाही. आपल्याशिवाय सरकार बसू शकत नाही, हे जेव्हा लक्षात आले तेव्हापासून त्यांनी आवळायला सुरुवात केली. ज्याचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री हे भाजप सेनेचे अंडरस्टँडिंग होते. त्यापूर्वी 1995 मध्ये मनोहर जोशी आणि नारायण राणे मुख्यमंत्री झाले. भाजपने कुठे केला दावा. मग तुम्ही कसा दावा करता. अडीच वर्षासाठी फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे मोदी कुठे म्हणाले. निकाल लागल्यानंतर हे उद्योग त्यांना आठवले.
काँग्रेससोबत जाण्यासाठी सर्व गोष्टी एकनाथ शिंदे यांना करायला सांगितल्या. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे त्यांना सांगितले होते. नंतर स्वत बसले. जे केले ते स्वार्थासाठी केले. साधी गोष्ट लक्षात घ्या. काँग्रेस एनसीपीच्या विरोधात आजपर्यंत निवडणुका लढवल्या. अचानक उठता आणि त्यांच्यासोबत जाऊन बसता. लोकांनी तुम्हाला भाजप शिवसेना म्हणून मतदान केले. तुम्ही काँग्रेससोबत जाता ही प्रतारणा नाही का. तुम्ही तटस्थ राहायला हवे होते.