मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा गट तिसरा पार्टनर म्हणून सत्तेत सामील झाला. मात्र अजित पवारांच्या सत्तेत येण्यानं मंत्रालयातली केबिन नंबर 602 पुन्हा चर्चेत आलीय. मंत्रालयातल्या सहाव्या मजल्यावरची ही एक केबिन. ती केबिन शापित असल्याची चर्चा मंत्रालयात होत राहते. कारण आजपर्यंत ते केबिन ज्या-ज्या मंत्र्याला मिळालंय, त्या-त्या मंत्र्याला त्याच्या राजकीय आयुष्यात तोंड द्यावं लागलंय. या अफवा असतानाच दुसरीकडे अजित पवारांनीही आता क्रमांक 602 ची केबिन घेण्यास नकार दिल्याचं बोललं जातंय. मंत्रालयातल्या सहाव्या मजल्यावरची रचना नेमकी कशी आहे? ते ढोबळ पद्धतीनं समजून घेऊयात.
सध्या सहाव्या मजल्यावर केबिन क्रमांक 601 आहे, जिथं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसतात. 602 नंबरच्या केबिनमध्ये अनेक वर्षांपासून मंत्री बसत नाहीत. 603 नंबरची केबिन मुख्यमंत्री शिंदेंचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंहांकडे आहे. 604 नंबरच्या केबिनमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सचिव श्रीकर परदेशी बसतात आणि 605 नंबरच्या केबिनमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारभार पाहतात.
आता या 5 पैकी अजित पवारांना कोणती केबिन मिळालीय? हे समजून घेण्याआधी केबिन नंबर 602 बद्दल मंत्रालयात काय चर्चा होतात, तिथं मंत्री बसायला का घाबरतात. ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
602 केबिनबद्दल मंत्रालयात एक चर्चा असते, की इथं जो मंत्री बसतो, त्याच्या राजकीय कसोटीचा काळ सुरु होतो. असं म्हणतात की 2014 आधी 602 नंबरच्या केबिनमध्ये अजित पवार बसले होते. त्यानंतर योगायोगानं अनेकदा त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीनं हुलकावणी दिली. सिंचनसह शिखर बँकेवरुन घोटाळ्याचे आरोप झाले. नंतर 2019 मधली पहाटेची शपथ आणि 2023 मधली दुपारची शपथ अशा देशभर गाजणाऱ्या दोन शपथविधी त्यांनी घेतल्या.
2014 मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर एकनाथ खडसेंना 602 केबिन दिली गेली होती. खडसेंकडे ७ हून जास्त मंत्रीपदं होती. मात्र त्यांच्यामागे आरोपांच्या फैरी सुरु झाल्या आणि मंत्रिपदाच्या दीडच वर्षात त्यांना राजीनामा द्यावा लागला.
एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजप नेते पांडुरंग फुंडकर 602 केबिनमध्ये आले. खडसेंच्या कृषीखात्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली. मात्र त्यांचं अकाली निधन झालं.
पांडुरंग फुंडकरांनंतर भाजपचे अनिल बोंडे 602 केबिनमध्ये आले. फुंडकरांच्या कृषीखात्याची जबाबदारी बोंडेकडे आली. मात्र मंत्री असूनही 2019 च्या निवडणुकीत बोंडेंचा पराभव झाला. नंतर राज्यसभेत खासदार घेऊन बोंडेंचं राजकीय पुनर्वसन केलं गेलं.
मंत्रालयातले काही जण 602 केबिन बदनाम होण्याची चर्चांमागे वास्तूशास्त्राचा दाखला देतात. वास्रूशास्रात घर किंवा कार्यालयाचं तोंड दक्षिण दिसेला असणं अशुभ मानलं जातं. सहाव्या मजल्यावरच्या दालनांची रचना आणि दिशा बघितली तर मुख्यमंत्र्यांचं दालन पूर्व दिशेला, प्रधान सचिवांचं दालन पश्चिम दिशेला, उपमुख्यमंत्र्यांचं दालन उत्तर दिशेला आणि क्रमांक 602 दालन मात्र दक्षिण दिशेला आहे, म्हणून 602 केबिनचा जेव्हाही विषय निघतो, तेव्हा त्यात याचीही भर होते.
दरम्यान, जर अजित पवार 602 केबिनमध्ये बसणार नसतील, तर मग सहाव्या मजल्यावर त्यांच्यासाठी आता कोणती केबिन असेल? कारण आतापर्यंत प्रामुख्यानं सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचीच दालनं असायची.
जेव्हा मविआचं सरकार होतं, तेव्हा ही केबिन मुख्यमंत्र्यांसाठी आणि आत्ता ज्या केबिनमध्ये फडणवीस बसतात, ती केबिन उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांकडे होते. पण महाराष्ट्रात पहिल्यांदाच एकाचवेळी दोन उपमुख्यमंत्री झाल्यानं दालनांच्या रचनेत बदल करावा लागणाराय.
माहितीनुसार मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आणि उपमुख्यमंत्र्यांचे सचिव यांना दुसऱ्या जागी हलवलं जाणार आहे आणि त्यांच्या केबिन 603 आणि 604 एकत्र करुन ती अजित पवारांना दिली जाईल. मात्र या चर्चा आहेत. त्यात काहीही तथ्य नसल्याचं सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलंय.