मुंबई | 25 ऑगस्ट 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या सर्व 40 आमदारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नोटीसला उत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे प्रत्येक आमदाराने तब्बल सहा ते साडेसहा हजार पानांचं उत्तर विधानसभा अध्यक्षांना पाठवलं आहे. या उत्तरात त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सर्व खदखद व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना पक्षफुटीआधी आणि नंतर काय-काय घडामोडी घडल्या, एकनाथ शिंदे यांना का बंड पुकारावं लागलं, याबाबत आमदारांनी सविस्तर भूमिका मांडल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारापासून दूर गेले, पक्ष हिंदुत्वापासून वेगळ्या दिशेला जात होता, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या आमदारांकडून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे 6 हजार पानी उत्तर दाखल करण्यात आलं आहे. या उत्तरात आमदारांकडून याबाबतचा दावा करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या आमदारांकडून 2014 आणि 2019च्या AGMचा तपशील सादर करण्यात आला आहे. आमदारांनी अध्यक्षांना दिलेल्या उत्तरात ई-मेलच्या प्रत देखील जोडल्या आहेत.
याबाबत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिलीय. “विधानसभा अध्यक्षांनी आम्हाला जी काही नोटीस जारी केली होती त्या नोटीसला आम्ही सर्व जवळपास 40 आमदारांनी उत्तर दिलेलं आहे. या नोटीसला उत्तर दिल्यानंतर आम्ही काय उत्तर दिलंय यापेक्षा त्याच्या पानांची जास्त चर्चा आहे. प्रत्येक आमदाराचं उत्तर हे सहा ते साडेसहा हजाराचं आहे. काही लोकांचा गैरसमज झालाय की सर्व आमदारांचं मिळून साडेसहा हजार पानांचं उत्तर आहे. तर तसं नाहीय”, असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं.
“सर्व आमदारांनी आपलं वेगळं म्हणणं मांडलेलं आहे. सर्व आमदारांनी पूर्वी घडलेला घटनाक्रम मांडला आहे. आम्ही उद्धव ठाकरेंसोबत एकत्र होतो त्यावेळी घडलेल्या घटना, पक्षप्रमुखांबरोबर झाल्या चर्चा, त्यांच्याबरोबर झालेले पत्रव्यवहार, बैठका याचा सर्व तपशील दिलेला आहे. जेव्हा हा उठाव झाला त्यापूर्वी झालेल्या घटना, मग विधान परिषदेच्या निवडणुका असूद्या किंवा राज्यसभेची निवडणूक असेल, त्यात घेतलेली भूमिका, या सगळ्या बारीकसारिक गोष्टींचा या उत्तरात उल्लेख आहे”, असं संजय शिरसाट यांनी सांगितलं.
“मी पूर्वीच सांगितलं आहे की, विधानसभा अध्यक्षांनी काहीही निर्णय देऊ द्या. पण त्याचा दूरगामी परिणाम पडणार आहे. ज्याच्या विरोधात निकाल जाईल तो सुप्रीम कोर्टात जाईल. त्यामुळे सुप्रीम कोर्टात गेल्यानंतरही आपली बाजू कुठेही कमी असू नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे सविस्तर उत्तर दिलेलं आहे. आमची भूमिका ऐकून घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्ष आमच्या बाजूने निर्णय देतील, असा आम्हाला विश्वास आहे”, असं मत संजय शिरसाट यांनी मांडलं.