शिवसेनेवर ताबा मिळवल्यानंतर शिंदे गट किती मजबूत होणार?; हातात काय-काय येणार?

| Updated on: Jan 10, 2024 | 10:12 PM

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाजूने निकाल दिल्यामुळे शिंदे गटात उत्साहाचं वातावरण आहे. या निकालामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्ष मजबूत होणार आहे. त्याचा आगामी लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंना निश्चितच फायदा होऊ शकतो.

शिवसेनेवर ताबा मिळवल्यानंतर शिंदे गट किती मजबूत होणार?; हातात काय-काय येणार?
Follow us on

मुंबई | 10 जानेवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल जाहीर केला. हा निकाल पूर्णपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला. त्यामुळे ठाकरे गटाला सर्वात मोठा झटका बसलाय. ठाकरे गट आता या निकालाला कोर्टात आव्हान देणार आहे. पण विधानसभा अध्यक्षांच्या आजच्या निर्णयाचा एकनाथ शिंदे यांना मोठा फायदा होणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांचाच पक्ष हा मूळ शिवसेना पक्ष आहे, असा निकाल दिला आहे. विधानसभा अध्यक्षांनी हा निकाल जाहीर करताना केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाचादेखील दाखला दिला. त्यामुळे पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला पुन्हा एकदा अधिकृतपणे मिळालं आहे. विधानसभा अध्यक्षांनी आमदार भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्तीदेखील कायदेशीर ठरवली आहे. पण तरीही भरत गोगावले यांच्याकडून जारी करण्यात आलेला व्हीप योग्यरित्या ठाकरे गटाच्या आमदारांना लागू करण्यात आला नाही, त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं, असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या सर्व आमदारांना पात्र ठरवलं आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. या निकालामुळे आता शिंदे गटाची ताकद मजबूत होणार आहे. कारण शिंदे गटाला कायदेशीर मान्यता मिळाली आहे. त्यामुळे उगवत्या सूर्याला नमस्कार अशा म्हणीप्रमाणे शिवसैनिकांचा ओढ आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे जाण्याची चिन्हं आता. याशिवाय एकनाथ शिंदे हे सत्तेत आहेत. ते स्वत: मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वात सरकार आहे. त्यामुळे त्यांची ताकद चारही बाजूने वाढणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना मिळालेला हा दिलासा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांना आता शिवसेनेचा ताबा मिळाल्यानंतर त्यांचा गट किती मजबूत होणार हे आपण मुद्देसूदपणे समजून घेऊयात.

पक्ष मजबूत होणार

एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिला आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रतेचा निकाल घेण्याचा आदेश दिला होता. विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही बाजूचे युक्तिवाद, उलटसाक्ष नोंदवल्यानंतर आज आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर केला. त्यांनी हा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या गटात उत्साहाचं वातावरण आहे. या निर्णयामुळे शिंदे सरकार आणखी मजबूत झालं आहे. तसेच शिंदे सरकार मजबूत असल्याने आता सत्तेकडे आकर्षित होणारे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार एकनाथ शिंदे यांची साथ पकडू शकतात. त्यांच्यासह त्यांचे पदाधिकारी देखील शिवसेनेत प्रवेश करु शकतात. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा पक्ष आणखी जास्त जोमाने मजबूत होणार आहे.

शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची ताकद वाढणार

आमदार अपात्रतेच्या निकालामुळे आता राज्यभरात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची ताकद वाढणार आहे. शिंदे गटाचे पदाधिकारी आता बिंधास्तपणे त्यांच्या मतदारसंघात, शहरात आपल्या पक्षाचा प्रचार करु शकणार आहेत. ते ठाकरे गट आणि विरोधकांना रोखठोकपणे जाहीर सभांमधून प्रत्युत्तर देऊ शकतात. तसेच त्यांच्यासोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे. परिणामी ठाकरे गटासाठी आगामी काळात आव्हानं वाढू शकतात.

शिंदे गटाला पक्ष कार्यालय, पक्षाचं फंड मिळणार?

केंद्रीय निवडणूक आयोग आणि आता विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा मूळ शिवसेना पक्ष असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचं कार्यालय आणि फंडवर दावा करु शकतात. पण एकनाथ शिंदे यांनी 20 फेब्रुवारी 2023 या दिवशीच याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. शिवसेनेच्या कोणत्याही संपत्तीवर आणि मालमत्तेवर आपण दावा करणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. तरीही एकनाथ शिंदे यांनी शिवसेना भवनवर दावा केला तरी त्यांना ते मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण शिवसेना भवनाची जागा ही शिवाई ट्रस्टच्या नावावर आहे. या ट्रस्टचे पदाधिकारी ठाकरे गटातील आहेत.

ठाकरे गटाला निवडणुकांमध्ये धक्का बसण्याची शक्यता

एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे अनेक वर्ष सत्तेत असलेले आमदार, खासदार आहेत. या आमदार, खासदारांचं त्यांच्या मतदारसंघात वर्चस्व आहे. या आमदारांची स्थानिक पातळीवर चांगली पकड आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा पक्ष सर्वसामान्य लोकांपर्यंत जास्त लवकर पोहोचू शकतो, तसेच त्यांना न्यायही मिळवून देऊ शकतो. याशिवाय एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत जे निर्णय घेतले आहेत त्यामुळे देखील त्यांची लोकप्रियता राज्यात वाढत आहे. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसचं तिकीट मोफत देण्याचा निर्णय घेतला. तसेच महिलांना एसटी बसचे शुल्क अर्धे आकारण्याचा निर्णय दिला. त्यांच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तसेच नागरिकांपर्यंत थेट तो निर्णय पोहोचत आहे, सर्वसामान्यांना थेट फायदा होतोय. त्यामुळे नागरीक शिंदेंकडे आता सकारात्मक नजरेतून पाहत आहे. त्यामुळे याचा फटका ठाकरे गटाला आगामी निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.