मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची रणनीती काय असेल याबाबत खुलासा केला आहे. मुंबईकरांना दररोज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मुंबईकरांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय काय करणार याबाबत त्यांनी त्यांचा प्लान सांगितला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘2016 मध्ये मी एक घोषणा केली होती. मुंबईच्या एमएमआर रिजनमधील कोणत्याही भागात एक तासात जाता आलं पाहिजे. आम्ही त्याच्या पुढे जात आहोत. कोस्टल रोड झाला. वर्सोवा मढचं टेंडर दिलं. त्याचं काम सुरू होत आहे. मढपासून विरारपर्यंत सिलिंक तयार केली आहे.’
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘जपान सरकारने ४० हजार कोटी देण्याचं कबूल केलं आहे. त्यामुळे मुंबईची वाहतूक कमी होणार आहे. ३७५ किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क करणार आहोत. पाच वर्षात हे काम सुरू केलं. हे सर्व काम जेव्हा होईल तेव्हा मुंबईकरांचं एक महत्त्वाचं काम आहे ते पूर्ण होईल. मुंबईकरांचे तीन तास वाचतील. कुटुंबासोबत वेळ घालवता येणार आहे. बस सिस्टिमचा मेकओव्हर करणार आहोत. त्यासोबत मुंबई आणि एमएमआर रिजनमध्ये रहिवास ही मोठी समस्या आहे. ही समस्या आपण सोडवत आहे. आपण काम सुरू केलं आहे. मराठी माणसाला मुंबईतच घर मिळायला पाहिजे हे काम आपण सुरू केलं आहे.’
देवेंद्र फडणवास यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काल पहिला कॅबिनेट घेतली. अधिकाऱ्यांना वेगाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, ही आता सेलिब्रेशनची वेळ नाही. आता महाराष्ट्राच्या इच्छा आकांशा पूर्ण करण्याची वेळ आहे.
महायुतीला मोठं यश मिळाल्यानंतर काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक दिग्गज नेते आणि इतर क्षेत्रातील लोकं उपस्थित होते.