Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | लोकसभा निवडणुकीत कुणाला तिकीट, कुणाचा पत्ता कट होणार? चर्चा काय?

| Updated on: Mar 11, 2024 | 9:45 PM

लोकसभा निवडणुकीत कुणाला तिकीट मिळेल, आणि कुणाचा पत्ता कापला जाईल, याबाबत अनेक चर्चा होत आहेत. काही नेत्यांना पक्षांनी केलेल्या अंतर्गत सर्व्हेक्षणाचं टेन्शन आल्याचं बोललं जातंय. विविध लोकसभेच्या जागांबद्दल काय चर्चा होत आहेत? ते पाहूयात.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | लोकसभा निवडणुकीत कुणाला तिकीट, कुणाचा पत्ता कट होणार? चर्चा काय?
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

मुंबई | 11 मार्च 2024 : चर्चा अशी आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 2 सर्व्हे केले आहेत. ज्यात ४ ते ५ लोकसभा जागांबद्दलचे रिपोर्ट नकारात्मक निघालेत. भाजपच्या सर्व्हेतही तीच गोष्ट समोर आल्याची चर्चा आहे. असं म्हणतायत की सध्या शिंदेंचे खासदार असलेल्या नाशिक, वाशिम-यवतमाळ, कोल्हापूर, हातकणंगले, परभणी इथली स्थिती अनुकूल नाहीय. म्हणून यापैकी ३ जागांवरचे उमेदवार बदलावेत, किंवा जागांची अदलाबदल व्हावी, अशा सूचना शिंदेंना भाजपकडून देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. नाशकातून शांतिगिरी महाराज इच्छूक आहेत. आधी राज ठाकरेंच्या निवासस्थानी शांतिगिरी महाराज गेले होते. मात्र राज ठाकरेंची भेट झाली नाही. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची शांतिगिरी महाराजांनी भेट घेतली.

दरम्यान, नाशिकचं तिकीट पुन्हा आपल्यालाच मिळण्याचा विश्वास विद्यमान खासदार हेमंत गोडसेंनी व्यक्त केलाय. तिकडे सांगलीत चर्चा आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांची. मोठं शक्तिप्रदर्शन करत चंद्रहार पाटील मुंबईत दाखल झाले. ठाकरेंच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला. त्यांना सांगली लोकसभेचं तिकीट मिळण्याची चिन्हं आहेत. मात्र सांगलीची जागा आम्हालाच मिळेल, असं काँग्रेसचे विश्वजित कदम म्हणतायत.

कोल्हापूर आणि सांगलीत काय घडणार?

दुसरी चर्चा अशीही आहे की, कोल्हापूर लोकसभेची जागा ठाकरेंची शिवसेना काँग्रेसला देऊ शकते. त्यामोबदल्यात काँग्रेसची सांगलीची जागा ठाकरेंना मिळावी यासाठी प्रयत्न होतायत. असं झालं तरी गेल्यावेळी आघाडीकडून लढलेल्या विशाल पाटलांचं काय होणार? हा प्रश्न आहे. 2019 ला सांगलीत भाजपचे संजयकाका विरुद्ध स्वाभिमानीचे विशाल पाटील आणि तेव्हा वंचितमध्ये असलेले पडळकर लढले. भाजपचा 1,64,352 मतांनी विजय मिळाला. या विजयात वंचितच्या पडळकरांनी घेतलेली 3 लाख 234 मतं निर्णायक ठरली.

इकडे मुंबईतही शिंदे-भाजपात एका जागेच्या अदला-बदलीची चर्चा जोरात आहे. ठाण्याची जागा शिवसेनेकडे असली तरी विद्यमान खासदार राजन विचारे उद्धव ठाकरेंसोबत आहेत. त्यामुळे भाजप यंदा ठाण्याची जागा शिंदेंच्या शिवसेनेसाठी देईल. मोबदल्यात शिंदेंनी मुंबई उत्तर पश्चिमची जागा भाजपला द्यावी असं बोललं जातंय. ठाण्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना अर्थात राजन विचारे विरुद्ध शिंदेंचे रविंद पाठक किंवा प्रताप सरनाईकांमध्ये लढत होऊ शकते. तर मुंबई उत्तर पश्चिम गजानन किर्तीकरांऐवजी भाजपकडून माधुरी दीक्षितला उतरवलं जावू शकतं.