मुंबई : ’50 खोके, एकदम ओके’, शिवसेनेतल्या बंडानंतर महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी ही घोषणा देशभरात पोहोचवलीय. विधानभवनाच्या पायऱ्यांवर, बैलांच्या अंगावर, हॉटेलमधल्या थाळीवर आणि स्टेडियममधल्या बोर्डवरही ही घोषणा पाहायला मिळाली. पण या घोषणेचा उगम कुठून झाला? ही घोषणा सगळ्यात पहिल्यांदा कुणी दिली? याचं उत्तर आज खुद्द संजय राऊतांनीच दिलंय.
संजय राऊतांच्या मते 50 खोके, एकदम ओके या घोषणेचे जनक काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल आहेत. याबद्दल आज संजय राऊतांनी गोरंट्याल यांचं कौतुकही केलं.
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागलं होतं. त्यावेळी मुंबईतल्या विधानसभेच्या परिसरात कैलास गोरंट्याल यांनी ही घोषणा पहिल्यांदा दिली होती.
गोरंट्याल यांनी या घोषणेमागची प्रेरणा शहाजीबापू पाटलांकडून घेतली होती अशी चर्चा आहे. गुवाहाटीला असताना आमदार शहाजीबापू पाटलांचा एक फोन कॉल व्हायरल झाला होता.
शहाजीबापूंचा फोन कॉलमध्ये काय म्हणाले होते?
कार्यकर्ता- नेते नमस्कार..
शहाजीबापू पाटील – नमस्कार नमस्कार
कार्यकर्ता- अहो कुठाय नेते, 3 दिवस झालं फोन लावतूय, फोनच लागत नाही
शहाजीबापू पाटील- आम्ही सध्या गुवाहाटीमधी हाय. काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओक्केमधी हाय
शहाजीबापूंच्या याच ऑडिओ क्लिपमधला ओके हा शब्द गोरंट्याल यांनी उचलला..आणि ओकेच्या आधी 50 खोके हा शब्द लावला..
गोरंट्याल यांनी ही घोषणा दिल्यानंतर विरोधकांनी ती अख्ख्या राज्यात फेमस केली. विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिंदे गटाच्या समोर ही घोषणा देण्यात आली. यानंतर अधिवेशनाच्या प्रत्येक दिवशी ही घोषणा दिली गेली. यावरुन राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी आणि शिंदे गटाच्या महेश शिंदेंमध्ये हमरीतुमरी झाली होती.
कधी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर या घोषणेचे बॅनर झळकवले. तर कधी चक्क खोकेच आणून आंदोलन केलं.
50 खोके, एकदम ओके या घोषणेचा त्रास बच्चू कडू आणि गुलाबराव पाटलांनाही झाला होता.
लग्नात गेलो तरी खोकेवाला आला, असं बोललं जात असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं होतं.
बेंदूर सणाला काही शेतकऱ्यांनी बैलांच्या अंगावर 50 खोके, एकदम ओके ही घोषणा लिहिली.
सोलापुरातल्या एका हॉटेल मालकानं तर 50 खोके, एकदम ओके ही थाळीच सुरु केली.
भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या एका क्रिकेट सामन्यातही काही चाहत्यांनी 50 खोके..एकदम ओके या घोषणेचा बोर्ड झळकावला होता.
आजही विरोधक सत्ताधाऱ्यांसाठी हीच घोषणा वापरतायत. महाराष्ट्रभर ही घोषणा प्रसिद्ध झाल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. त्याचं श्रेय आज राऊतांनी कैलास गोरंट्याल यांना दिलंय.