मुंबई : कोरोना काळात केलेल्या कामासाठी थेट जागतिक आरोग्य संघटनेकडून बेस्टची दखल घेण्यात आलीय. त्यामुळे मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा लागला आहे. बेस्टचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार सिंगल (एम.डी.) यांना जागतिक आरोग्य संघटनेने कोविड मुक्त मोहिमेसाठी बाह्य तज्ज्ञ सल्लागार म्हणून आमंत्रित केलंय. बेस्टच्या या सामुदायिक कार्याची दखल यापूर्वी जिनिव्हा येथील आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनेही घेतली होती (WHO invite Mumbai Best chief medical officer for his Covid work).
जागतिक आरोग्य संघटना (WHO), जी-20 (G-20 leader country), युरोपीयन युनियन (European Commission), फिंड (FIND), मेलिंडा अँड बिल गेट फाऊंडेशन (Melinda & Bill Gate foundation) यांनी एक मोहिम सुरू केलीय. यात The Access to Covid-19 Tools Accelerator(ACT-A) या मोहिमेअंतर्गत तात्काळ अॅंटिजेन टेस्टद्वारे कोविड मुक्तीचं काम हाती घेण्यात आलंय. आता या विषयावर चर्चा करण्यासाठी त्यांनी बेस्टचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार सिंगल (एम.डी.) यांना बाह्य तज्ञ सल्लागार 28 जून 2021 रोजी आमंत्रित केलं आहे.
“कार्यक्षम सेवेची अखंड परंपरा” या ब्रीदवाक्याला अनुसरून कोविड टाळेबंदी काळात इतर सर्व वाहतूक सेवा बंद असताना बेस्ट उपक्रमाने अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता पालघर, आसनगाव, बदलापूर, पनवेल पर्यंत आपल्या बसगाड्यांद्वारे वाहतूक सेवा उपलब्ध करून दिल्या. तसेच बेस्टच्या वीज कर्मचाऱ्यांनी देखील न घाबरता नवीन कोविड सेंटरला त्वरित वीज पुरवठा उपलब्ध करून दिला आणि युद्धपातळीवर कोविड हॉस्पिटल व संसर्गजन्य विभागात वीजपुरवठा पुनर्स्थापित करून दिला. म्हणूनच कोविड महामारीत बेस्ट मुंबईची मुख्य लाईफ लाईन म्हणून उदयास आली आहे.
अशा उपाययोजनांमुळे संपूर्ण मुंबई कोविडमुळे अतिबाधित झाली असताना देखील पहिल्या लाटेत 2900 व दुसऱ्या लाटेमध्ये केवळ 565 बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली.