महाविकास आघाडीचं सरकार कुणी पाडलं? उद्धव ठाकरे यांचं सूचक विधान काय?; मोठा गौप्यस्फोट

| Updated on: Dec 16, 2023 | 5:40 PM

मुंबईवर संकट आलं तेव्हा पहिल्यादां शिवसैनिकच धावतो. जोपर्यंत मी मुख्यमंत्रीपदी आहे, तोपर्यंत मुंबई गिळता येणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळेच त्यांनी आमच्या सरकार विरोधात कटकारस्थान रचलं नाही ना हा संशय येतो. हे खोके सरकार कशासाठी? कुणासाठी? त्यांना पैसा कुणी पुरवला हे उघडकीस आलं आहे, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

महाविकास आघाडीचं सरकार कुणी पाडलं? उद्धव ठाकरे यांचं सूचक विधान काय?; मोठा गौप्यस्फोट
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | 16 डिसेंबर 2023 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अदानी समूहाविरोधातील मोर्चात राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच महाविकास आघाडीचं सरकार कुणी पाडलं? कशासाठी पाडलं? या मागे कोण आहे? याचा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी उद्योगपती गौतम अदानी यांचं नाव न घेता हे सूचक विधान केलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. सरकार पाडण्यामागे अदानी आहे का? अशी चर्चा आता रंगली आहे. यावेळी त्यांनी धारावीकरांना 500 चौरस फुटाचं घर देण्याची जोरदार मागणीही केली.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात अदानी उद्योग समूहाच्या कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. धारावीकरांसाठी संपूर्ण मुंबईच काय गरज पडली तर महाराष्ट्र धारावीत उतरवेन, असं मी वचन दिलं होतं. आम्ही मोर्चात आज मोजकेच कार्यकर्ते उतरवले आहेत. हे दृश्य अदानी आणि त्यांच्या बापजाद्यांना दाखवा. ज्यांनी ज्यांनी अदानीची सुपारी घेतली आहे. त्या सुपारीबाजांना, दलालांना सांगतो हा अडकित्ता लक्षात घ्या किती मोठा आहे. खलबत्ता आहे, अडकित्ता आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा अदानीचं नाव घेणार नाही, अशी तुमची दलाली चेचून, ठेचून टाकू, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

नशीब तुमची महुआ मोईत्रा नाही केली

धारावीचा विकास सरकारने करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. यांना पन्नास खोके कमी पडले म्हणून हे बोके धारावी गिळायला निघाले आहेत. यांची मस्ती वाढत चालली आहे. हे असंवैधानिक सरकार आहे. यांना वाटतं आपल्याला कुणी जाब विचारू शकत नाही. वर्षाताई तुम्ही जाब अदानीला विचारला तर भाजप उत्तर देतं. नशीब तुमची महुआ मोईत्रा केली नाही. मोईत्रा यांनी सरकारला प्रश्न विचारले त्यांना निलंबित केलं. नशीब तुम्ही अजूनही सभागृहात जात आहात, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

जगातील सर्वात मोठा टीडीआर घोटाळा

सरकार आपल्या दारी म्हणणारं हे सरकार अदानीच्या दारी आहे. आम्ही अदानी विरोधात तिरीमिरीने उतरलो आहोत. धारावीतील सर्वांचा एफएसआय अदानीला देऊन टाकला आहे. पाऊस पाडणाऱ्या ढगांचा एफएसआय दिला नाही हे नशीब. ढगांची गरज नाही. सवलतींचा पाऊसच एवढा पाडला आहे, असं सांगतानाच हा जगातील सर्वात मोठा टीडीआर घोटाळा आहे, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

एक तरी बिल्डरधार्जिणा निर्णय दाखवा

उद्धव ठाकरे टीडीआर लॉबीची बाजू घेतात अशी माझ्यावर टीका केली. तुम्ही अदानीचे बुट चाटत आहात ते कशासाठी? मी मुख्यमंत्री असताना नागरिकांना बाजूला ठेवून बिल्डरसाठी घेतलेला एक तरी निर्णय दाखवा. बिल्डरधार्जिणे तुम्ही आहात. हा लढा मुंबईचा राहिला नाही. हा महाराष्ट्राचा झाला आहे. अदानीला मुद्रांक शुल्क माफ केले. त्यामुळे महाराष्ट्रावर आर्थिक परिणाम होणार आहे.

सब भूमी गोपाल की ऐकलं होतं. आता सब भूमी अदानी की होऊ देणार नाही, असा इशारा देतानाच आमचं अडीच वर्ष यशस्वी चाललेलं सरकार, गद्दारी करून सरकार पाडलं. ते कुणी पाडलं हे तुम्हाला कळलं असेल. विमान कुणी पुरवलं असेल? हॉटेल कुणी बुकींग केलं असेल? सरकार पाडण्याचं कारणही तुम्हाला कळलं असेल, असं सूचक विधान त्यांनी केलं.