मुंबई: गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून रणकंदन सुरू आहे. नवनीत राणा (navneet rana) यांनी कोणत्याही परिस्थितीत मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणणारच असा हेका लावल्यानंतर शिवसैनिकांनी (shivsena) मातोश्रीबाहेर तोबा गर्दी केली. शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यांना मातोश्रीवर येऊनच दाखवा असं आव्हान दिलं. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर लगेच शिवसैनिकांनी राणांच्या घराच्या खाली जाऊन जोरदार आंदोलन केलं. त्यामुळे आणखीनच तणाव निर्माण झाला. राणा दाम्पत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची सबब पुढे करून आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर केलं. पण शिवसैनिक काही राणा कुटुंबीयांच्या घराबाहेरून हटेनात. एवढं कमी होतं की काय राणा यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. त्यानंतर त्यांना अटकही झाली. त्यामुळे त्यांच्या मदतीला प्रसिद्ध वकील रिजवान मर्चंट (Lawyer Rizwan Merchant) धावून गेले आहेत. मर्चंट हे राणा यांची बाजू कोर्टात मांडणार आहेत. या केसमुळे पुन्हा एकदा मर्चंट चर्चेत आले आहेत.
राणा दाम्पत्य आज सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा म्हणणार होते. मात्र, मातोश्रीबाहेर शिवसैनिक येऊन थांबल्याने नवनीत राणा आणि रवी राणा मातोश्रीवर आले नाहीत. उलट शिवसैनिकांनी राणा यांच्या घराच्या खाली जाऊन जोरदार निदर्शने केली. त्यानंतर दुपारी रवी राणा यांनी आम्ही आंदोलन मागे घेत आहोत, असं जाहीर केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत येत आहेत. त्यामुळे कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून आंदोलन मागे घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यानंतर संध्याकाळी राणा दाम्पत्यांविरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे पोलीस राणा दाम्पत्यांना अटक करण्यासाठी आले. त्यावेळी नवनीत राणा यांनी अटक वॉरंटची मागणी करत हुज्जत घातली. त्यामुळे अटकेचा हाय व्होल्टेज ड्रामा निर्माण झाला.
नऊ वर्षापूर्वी रिजवान मर्चंट यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. जून 2013मध्ये माहीम येथे अल्ताफ मेन्शन नावाची इमारत कोसळली होती. या इमारतीत मर्चंट यांचा मुलगा फराज, पत्नी असिफा आणि ताहिरा यांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. त्यांच्यावरचा हा सर्वात मोठा घाला होता. त्यांचे कुटुंबीय या दुर्घटनेच्या काही दिवसांपूर्वीच तुर्कीहून परतले होते. त्यानंतर ही घटना घडली होती.