मुंबई | 26 ऑक्टोबर 2023 : प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. या हल्ल्याप्रकरणी मंगेश साबळे यांच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तिघेही मराठा क्रांती मोर्चाशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. या हल्ल्यानंतर मंगेश साबळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यापूर्वीही मराठा आंदोलनाच्यावेळी ते चर्चेत आले होते. कोण आहेत हे मंगेश साबळे? त्यांनी सदावर्ते यांच्या कारची तोडफोड का केली? याचा घेतलेला हा मागोवा.
मंगेश साबळे हे संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच आहेत. अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. यापूर्वी त्यांनी पंचायत समितीसमोर पैसे उधळण्याचं अनोखं आंदोलन केलं होतं. त्यामुळे ते चर्चेत आले होते. एवढेच नव्हे तर अंतरवली सराटीत जेव्हा मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला, तेव्हा त्या घटनेचा निषेध म्हणून मंगेश यांनी भररस्त्यात आपली महागडी कार पेटवली होती. त्यामुळे मंगेश चर्चेत आले होते. पुन्हा एकदा त्यांनी आता थेट सदावर्ते यांच्या कारचीच तोडफोड करून राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मंगेश साबळे हा मराठा क्रांती मोर्चातील गुणवंत आणि क्रियाशील कार्यकर्ता आहे. मागे त्याने स्वतःची गाडी पेटवून आंदोलन केले होते. तो लढवय्या कार्यकर्ता आहे. त्याला आम्ही सर्वोतोपरी मदत करू. मराठा समाजाला आतंकवादाच्या चौकटीत दाखवण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. सदावर्ते हे मराठा समाजाबद्दल चुकीची वक्तव्य करत असतात. मंगेश साबळे यांच्या पाठीशी आम्ही खंबीर पणे उभे राहू, असं मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितलं.
जालना जिल्ह्याच्या अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं होतं. यावेळी पोलीस आणि आंदोलकांची बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला होता. या घटनेत पोलीस आणि आंदोलक दोघेही जखमी झाले होते. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले होते. अनेक मराठा संघटनांनी रस्त्यावर उतरून जोरदार निषेध नोंदवला होता. त्यावेळी मंगेश साबळे यांनी फुलंब्रीत भर रस्त्यात आपली कार पेटवून देत अंतरवली सराटीतील मारहाण प्रकरणाचा निषेध नोंदवला होता. त्यानंतर 4 सप्टेंबर रोजी मंगेश यांनी अंतरवलीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेटही घेतली होती.
फुलंब्री पंचायत समितीसमोर पैसे उधळत मंगेश साबळे यांनी आंदोलन केलं होतं. विहिरीसाठी बीडीओ पैसे मागत असल्यामुळे त्यांनी नोटा उधळत आंदोलन केलं होतं. तब्बल दोन लाख रुपयांच्या नोटा उधळत मंगेश यांनी आंदोलन केलं होतं. त्यांच्या या आंदोलनामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. या आंदोलनाची माध्यमांनीही दखल घेतल्याने अखेर लाचखोर बीडीओला निलंबित करण्यात आलं होतं.