मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी 10 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला करताना पाच ते सहा वेळा मुन्ना यादवचं नाव घेतलं. मुन्ना यादवचं नाव घेऊन त्यांनी फडणवीसांवर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. मलिकांची पत्रकार परिषद संपते ना संपते तोच भाजप आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन मुन्ना यादववर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. यानंतर साहजिक, हा मुन्ना यादव नावाचा व्यक्ती आहे तरी कोण?, असा प्रश्न अनेकांना पडला.
मुन्ना यादव भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत. ते मुळचे नागपूरचे आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू सहकारी आणि निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. गेल्या 25 वर्षांपासून ते भाजपचे कार्यकर्ते आहेत. म्हणजेच फडणवीस यांच्या राजकीय कारकीर्दील सुरुवात झाल्यापासून मुन्ना यादव भाजपचे कार्यकर्ते आहेत. पण मुन्ना यादवच्या नावावर अनेक गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यांमुळे मुन्ना यादवला अनेकदा जेलची हवा देखील खावी लागली आहे. राजकीय नेते अनेकदा फडणवीसांवर टीका करताना मुन्ना यादवचा आवर्जून उल्लेख करतात.
मुन्ना यादव हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातून दोन वेळा मुन्ना यादव नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. मुन्ना यादवसाठी फडणवीसांनी मतदानही मागितलं आहे. त्याच्यासाठी प्रचारही केला आहे. तो कामगार मंडळाचा माजी अध्यक्ष राहिलेला आहे. विशेष म्हणजे फडणवीसांच्या इलेक्शन प्लॅनिंगमध्येही मुन्ना यादव अग्रेसर असतो. त्याची पत्नी सध्या भाजपची नगरसेवक आहे.
मुन्ना यादवला मोठ्या प्रमाणात राजकीय पाठबळ आहे. फडणवीसांच्या जवळचा कार्यकर्ता म्हणून त्याला विशेष ट्रिटमेंट दिल्याचा आरोपही 2014 ते 2019 दरम्यान झाला. एकंदरित नागपूरच नाही तर राज्याच्या राजकारणात देखील मुन्ना यादवचं नाव सातत्याने प्रकाशात असतं.
मुन्ना यादव नागपूरचा कुविख्यात गुंड, त्याच्यावर हत्येचे अनेक गुन्हे, तो देवेंद्र फडणवीस यांचा साथी आहे. त्या मुन्ना यादवला कन्स्ट्रक्शन वर्क्स बोर्डाचा सदस्य बनवलं होतं की नाही ते फडणवीसांनी स्पष्ट करावं. तुमच्या गंगेत अंघोळ करून मुन्ना यादव पवित्रं झाला का?, असा सवाल मलिकांनी यावेळी विचारला.
मी गेल्या 25 वर्षांपासून राजकारणात आहे. भाजपचा 10 वर्षे नगरसेवक होतो. त्यामुळं माझ्यावर काही राजकीय गुन्हे आहेत. याचा अर्थ मी काही गुंड नाही, असा उत्तर मुन्ना यादवने मलिकांना दिलं. नवाब मलिक माझी बदनामी करत आहेत. त्यांच्याविरोधात मी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं देखील मुन्ना यादवने सांगितलं.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मला बांधकाम कामगार मंडळाचे अध्यक्ष केले. कारण मी बऱ्याच वर्षांपासून राजकारणात आहे. माझ्यावर असलेले गुन्हे हे राजकीय आहेत. निवडणुकीच्या वादातून हे गुन्हे विरोधकांनी माझ्याविरोधात दाखल केले आहेत. आंदोलन करीत असताना राजकीय गुन्हे दाखल होतात. माझ्याविरोधात गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे नाहीत. याप्रकरणी आधीच माझी चौकशी झाली आहे. त्यात काहीही सापडले नाही. सरकार त्यांचे आहे. आता पुन्हा चौकशी करावी. मी चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असंही मुन्ना यादव म्हणाला.
हे ही वाचा :
नवाब मलिकांच्या हायड्रोजन बॉम्बनंतर देवेंद्र फडणवीसांचं लगेचच ट्विट; म्हणाले, डुकराशी कुस्ती…
रियाझ भाटीचं सचिन वाझे प्रकरणात नाव, राष्ट्रवादी काँग्रेसनं त्याला लपवलंय का? आशिष शेलार यांचा सवाल