मुंबई : महाराष्ट्र आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाचा निकाल गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे सत्ता संघर्षाचा फैसला सर्वोच्च न्यायालयाने केला. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, जस्टिस एमआर शाह, जस्टिस कृष्ण मुरारी, जस्टिस हिमा कोहली आणि जस्टिस पीएस नरसिम्हा यांच्या घटनापीठाने १६ आमदारांचा विषय राहुल नार्वेकर यांच्यांकडे सोपवला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी लवकर निर्णय घ्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर सर्वांच्या नजरा राहुल नार्वेकर यांच्याकडे लागल्या.
कोण आहेत राहुल नार्वेकर ?
राहुल नार्वेकर कुलाबा मतदार संघाचे आमदार आहेत. 2016 मध्ये राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारांमध्ये त्यांना संधी देण्यात आली होती. यापूर्वी ते शिवसेनेत होते. 2014 मध्ये शिवसेनेनं त्यांना लोकसभेचं तिकिट नाकारल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ मतदारसंघातून ते लोकसभा निवडणूकीत पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला. भाजपच्या तिकिटावर कुलाबा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. राहुल नार्वेकर हे कुलाब्यातील माजी नगरसेवक सुरेश नार्वेकर यांचे पुत्र आहेत. सुरेश नार्वेकर हे शिवसैनिक होते. राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांचे जावई आहेत.
अध्यक्षपदी निवड
भाजपचे राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून ३ जुलै रोजी निवड झाली. त्यांनी राजन साळवी यांचा पराभव झाला होता. राहुल नार्वेकर यांना 164 मते मिळाली. तर साळवी यांना 107 एवढ्याच मतांवर समाधान व्यक्त करावं लागलं. नार्वेकर हे 57 मतांच्या मताधिक्याने विजयी झाले. तर, या निवडणुकीत तीन आमदार तटस्थ राहिले.
उपाध्यक्षांची काय होती भूमिका
राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले होते. त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. उपाध्यक्ष असलेले नरहरी झिरवळ कामकाज पाहत होते. त्यांनी १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय दिला. या निर्णयाविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
नरहरी सीताराम झिरवळ हे विधानसभा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत.नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून ते सलग तीन वेळा निवडून आले आहेत.