गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 2 जानेवारी 2024 : डोरिन फर्नांडिस केसमध्ये अखेर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना साडे आठ कोटी रुपये द्यावे लागले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या पाठपुराव्यामुळे डोरिन फर्नांडिस या वृद्ध महिलेला ही मोठी रक्कम मिळाली आहे. पण डोरिन फर्नांडिस यांच्याबाबत पूर्ण न्याय झाला नाही, असं अंजली दमानिया म्हणतात. अंजली दमानिया यांनी या प्रकरणात लक्ष घातलं नसतं तर या कुटुंबाची वाताहत झाली असती. कुणी त्यांची दखलही घेतली नसती. भ्रष्टाचाराविरोधात खंबीरपणे लढणाऱ्या अंजली दमानिया यांनी यापूर्वीही अनेक लढे दिले आहेत. यावेळी त्यांच्यावर आरोपही झाले. पण त्यांना आरोपांना भीक घातली नाही. खंबीर आणि निडरपणे लढणाऱ्या अंजली दमानिया नेमक्या आहेत तरी कोण? करतात काय? त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? त्याचाच घेतलेला हा आढावा.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना त्यांची कौटुंबीक पार्श्वभूमी स्पष्ट केली. छगन भुजबळांना माझं बॅकग्राऊंड माहीत आहे. आरटीआय कार्यकर्ती किंवा भ्रष्टाचाराविरोधात लढणारी कार्यकर्ती एवढंच माझ्याबद्दल लोकांना माहीत आहे. पैसे खाण्यासाठी किंवा कुणाच्या सांगण्यावरून मी काम करतेय असं लोकांना वाटतं. संजय शिरसाट आणि छगन भुजबळांसारखे लोक यावरूनच माझ्यावर टीका करत असतात. माझे मिस्टर जेएम फायनान्शिअल कंपनीचे एमडी आणि सीईओ आहेत. त्यांच्या फायनान्समध्ये पाच डिग्र्या आहेत. सीएच्या परीक्षेत ते भारतातील रँक होल्डर आहेत. मी मेडिकल टेक्नॉलॉजी केलंय. माझं सांताक्रुझमध्ये डायग्नोस्टिक सेंटर होतं. ते 25 वर्ष चालवलंय, असं अंजली दमानिया यांनी सांगितलं.
आमचं कुटुंब अतिशय सधन आहे. वर्षाला पाच भुजबळ भरत नसतील एवढा टॅक्स अंजली आणि अनिश भरतात. त्यामुळे सुपारी घेण्याचं जे काम आणि घाण काम भुजबळांसारखे लोक करत असतील. खडसेंसारखे लोकं करत असतील. अजित पवारांसारखे लोक करत असतील. आम्ही तसं करत नाही. आमच्या घरात एक काळा पैसा येत नाही. पण दीड कोटी वर्षाचा इन्कम टॅक्स अंजली आणि अनिश भरतात, असं दमानिया यांनी ठणकावून सांगितलं.
माझं हे बॅकग्राऊंड ज्यांना माहीत नाही ते लोक तोंडाला येईल ते बोलतात हे ऐकून दु:ख होतं. आम्ही का लढतो?, कारण मी अख्खं जग फिरले, माझे तीन पासपोर्ट आहेत. 56 देश मी फिरून आले. अगदी नॉर्थ पोलच्या स्कँडेनेव्हीयन कंट्रीपासून ते ऑस्ट्रेलियापासून फिरून आलोय. काही देश तर आम्ही तीन तीन चार चार वेळा पाहिलेत. इतकं फिरून जेव्हा आपल्या देशात येतो तेव्हा आपला देश कधी बदलणार असं मला आणि माझ्या नवऱ्याला वाटायचं. म्हणून जेव्हा अण्णा हजारे यांची चळवळ सुरू झाली, तेव्हा त्या चळवळीत मी गेले. त्यानंतर आम आदमी पार्टी तयार झाली. तेव्हा त्याची मी महाराष्ट्राची अध्यक्षा होते. आम्ही पक्षाचे संस्थापक सदस्य आहोत. आपची निर्मिती का झाली? तर कुठे तरी राजकारण बदललं पाहिजे ही त्यामागची भावना होती. सर्व चांगल्या घरातील चांगली लोक त्यात आली होती, असं त्या म्हणाल्या.
2015 मध्ये मी आम आदमी पक्ष सोडला. तेव्हा मी लढा सोडावा की सुरू ठेवावा असा विचार होता. आता विरोधी पक्ष फुटले. शिवसेना फुटली. राष्ट्रवादी फुटला आता काँग्रेसही त्याच मार्गावर आहे. विरोधी पक्ष फुटला तर यांना विरोध करणारा कोणी तरी नको का? यांचे भ्रष्टाचार बाहेर यायला नको का?, असा सवाल करतानाच त्यामुळे आमच्या सारख्या लोकांना बाहेर पडावे लागले. ते काम आम्ही अविरत सुरू ठेवू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.