मुंबई – पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर पंजाब हादरलं. गेल्या काही दिवसांपासून या निमित्तानं पंजाबातील राजकारण आणि गँगस्टर्स सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतं आहे. यानंतर काही दिवसांतच बॉलिवूड अभिनेता सलामन खान आणि त्याचे वडील सलीम खान यांनाही धमकीचे पत्र आले आहे. या पत्रात तुझा सिद्धू मुसेवाला करु, अशी धमकी देण्यात आली आहे. आता सिद्धू मुसेवाला याची हत्या आणि सलमान खान यांचा काय संबंध असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. सलमान खान याला रविवारी धमकी आल्यानंतर गुन्हे शाखाचे अधिकारी सोमवारी त्याच्या घरीही दाखल झाले आहेत, प्रत्यक्षात मात्र ज्या दिवशी सिद्धू मुसेवालाची हत्या झाली त्यानंतरच सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या ज्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईने केली होती, त्याच बिष्णोई गँगकडून सलमानलाही धोका असल्याचे मानण्यात येते आहे. सध्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई हा तिहार जेलमध्ये आहे. लॉरेन्स गँग आणि कॅनडातील गोल्डी ब्रार यांनी मिळून सिद्धू मुसेवालाची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यांच्या एका सहकाऱ्याला मारण्यात सिद्धू मुसेवाला याचा हात होता म्हणून ही हत्या केल्याचे सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर या हत्येची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली होती. आता याच लॉरेन्स बिष्णोईच्या राजस्थानमधील गँग सलमानला धोका पोहचवेल असे सांगण्यात येते आहे.
सलमान खानने १९९८ साली शिकारीत २ चिंकारे आणि ३ काळी हरणे मारल्याचा ओरप सलमान खानवर होता. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई हा बिष्णोई समाजाचा आहे. बिष्णोई समाजात काळ्या हरणांना पवित्र मानण्यात येते. सलमानने त्यांची शिकार केल्याने गँगस्टर लॉरेन्सचा सलमानवर राग आहे. २०१८ साली लॉरेन्सने सलमानला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. २०२० साली एका हत्येचा आरोपात सापडलेल्या लॉरेन्सच्या काही साथीदारांनी सलमानच्या हत्येची योजना करण्यात आल्याचेही सांगितले होते. त्यानंतर मुंबईत सलमानच्या घराची रेकीही करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर
सलमान खान आणि त्याच्यासलोबत असलेल्या कलाकारांनी हम आपके है कोन, या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी १९९८ साली काळ्या हरणाची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात सहआरोपी सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांचीही नावे होती, मात्र त्यांची जोधूपर कोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती. तर सलमान खानला या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली होती. अजूनही या प्रकरणी राजस्थान हायकोर्टात सुनावणी सुरु आहे.
लॉरेन्स बिष्णोईचा जन्म पंजाबमध्ये एका संपन्न परिवारात झाला आहे. त्याने चंदीगडमधून कॉलेज शिक्षण पूर्ण केले. त्यावेळी तो विद्यार्थी चळवळीशी जोडला गेला. ज्यावेळी तो कॉलेजच्या निवडणुकीत हरला त्यावेळी त्याच्याविरोधात पहिला गुन्हा दाखल झाला. विद्यार्थी नेत्यातून त्याची प्रतिमा गुंड अशी बदलत गेली. नंतर त्याने गँग तयार केली, तो गँगवॉरमध्ये सहभागी झाला. त्याच्याविरोधात आत्तापर्यंत ५० हून अधिक प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. त्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, धमकावणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. २०१६ साली त्याला पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. एका वर्षापूर्वी त्याला मोक्का लावण्यात आला. त्यानंतर तो तिहार जेल ८ मध्ये कैदेत होता. सिद्धू मुसावालाच्या प्रकरणात लॉरेन्स आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या कोठडीत आहे.