मुंबईत भाषेनुसार आमदारांचं गणित बघितल्यास 2019 ला शिवसेनेचे 14 पैकी 14 आमदार मराठी होते. भाजपात 16 पैकी 10 मराठी, 4 गुजराती, 1 उत्तर भारतीय आणि 1 तमिळ भाषिक आमदार जिंकून आले. उमेदवार आणि पक्षीय मतं सोडली तर गुजराती किंवा उत्तर भारतीय बहुल भागामध्ये शिवसेनेला भाजपसोबतच्या युतीचा फायदा झाला., तर भाजपच्या उमेदवारांना पूर्ण मराठी बहुल भागात शिवसेनेच्या संघटनेचा लाभ मिळाला. बोरिवली, दहिसर, कांदिवली पूर्व, घाटकोपर पश्चिम, अंधेरी पश्चिम इथं भाजपचे 5 मराठी आमदार जिंकून आले.
या भागात भाषिक मतदारांचा क्रम बघितल्यास बोरिवलीत गुजराती नंतर मराठी, दहिसरमध्ये मराठी नंबर दोनवर गुजराती, कांदिवली पूर्वेत गुजराती-मराठी, घाटकोपर पश्चिममध्ये गुजराती-मराठी आणि अंधेरी पश्चिममध्ये मराठी-गुजराती यानंतर उत्तर भारतीय आणि मुस्लिमांची मतं निर्णायक होती.
शिवसेना वरळी, शिवडी, कलिना, चेंबूर, दिंडोशी, विक्रोळी, भांडूप, मागाठाणे, जोगेश्वरी पूर्व या मराठी मतदार निर्णायक असलेल्या विधानसभांमध्ये विजयी राहिली. भाजपचे अमराठी आमदार जिंकून आलेल्या भागांमध्ये घाटकोपर पूर्व, मुलुंड, चारकोप, मलबार हिल,
गोरेगाव आणि सायन कोळीवाड्याचा समावेश आहे. इथून अनुक्रमे भाजपचे ३ गुजराती, एक उत्तर भारतीय आणि एक तमिळभाषिक आमदार जिंकून आले. त्यापैकी मुलुंडमधलं भाषिक गणित गुजराती नंतर मराठी असं आहे. चारकोपमध्ये मराठी-गुजराती….मलबार हिलमध्ये गुजराती, उत्तर भारतीय, त्यानंतर मराठी, गोरेगावात मराठी नंतर गुजराती. सायन कोळीवाड्यात दक्षिण भारतीय, मराठी त्यानंतर पंजाबी मतं निर्णायक ठरतात.