विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज सभागृहात चांगलेच आक्रमक झाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत केलेल्या भाषणाचा मुद्दा मांडत भाजप आमदारांनी विधान परिषदेत निषेध नोंदवण्याचा ठराव मांडला. राहुल गांधी यांच्या भाषणावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया द्यावी, अशी मागणी सत्ताधारी आमदारांनी केली. यावेळी अंबादास दानवे हे उत्तर देण्यासाठी उठले. लोकसभेतील भाषणांचा आणि विधान परिषदेचा काही संबंध नाही, असा मुद्दा अंबादास दानवे मांडत होते. याचवेळी सत्ताधारी आमदारांनी त्यांचं ऐकून न घेता गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यामुळे वैतागलेल्या अंबादास दानवे यांचा तोल सुटला. त्यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांच्यावर शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या शिवीगाळला प्रसाद लाड यांनीदेखील प्रत्युत्तर देत अंबादास दानवे यांनी शिविगाळ केली. दोन्ही बाजूने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ झाली. पण शिवीगाळची सुरुवात अंबादास दानवे यांनी केली. या घटनेनंतर अंबादास दानवे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपण सभागृहात केलेल्या शिवीगाळचा आपल्याला पश्चात्ताप नसल्याचं ते म्हणाले.
“हे पाहा त्यांनी राहुल गांधींचा काही विषय मांडलेला होता. मी त्यांचं काही ऐकलेलं नाही आणि पाहिलं देखील नाही. कारण आम्ही सभागृहाच्या कामकाजात व्यस्त होतो. मला 260 वर भाषण करायचं होतं. मी माझे मुद्दे आणि इतर सर्व अभ्यास करत होतो. पण भाजप वेगवेगळ्या विषयांवर गोंधळ घालत असताना विरोधी पक्षनेता म्हणून मला विषयावर बोलण्याचा अधिकार आहे. म्हणून मी सभापतींना एवढाच विषय केला की, हा विषय आपल्या सभागृहाशी संबंधित आहे का? एवढाच प्रश्न मी सभापतींना केला. आहे किंवा नाही एवढचं उत्तर देणं सभापतींचं काम आहे. सभापतींनी आहे म्हटलं किंवा नाही म्हटलं तर त्यांनी सभापतींना जबाब विचारायचा होता. मला बोलायचं काही कारणच नव्हतं. त्यामुळे मी माझ्या जागेपासून बाजूला सारल्यानंतर मी शिवसैनिक म्हणून माझा अवतार धारण केला हे सत्य आहे”, अशी कबुली अंबादास दानवे यांनी दिली.
“सभागृहात आपण बोलतो, आपण सभापतींशी संवाद साधत असतो. एकमेकांशी संवाद साधत नाहीत. त्यामुळे त्यांनी सभापतींसोबत बोलायचं होतं. माझ्याकडे हातवारे, माझ्याशी विद्रुप हातवारे करण्याची गरज नव्हती. मला तुम्ही हिंदुत्व शिकवणार का? प्रसाद लाड सारखा माणूस? मला काही पश्चात्ताप होत नाही. मी जे बोललो ते बोललो”, अशी भूमिका अंबादास दानवे यांनी मांडली. यावेळी दानवे यांना भाजप नेत्याकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केला जात असल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर “तो कोण राजीनामा मागणारा? माझ्या पक्षाचे नेत बघितील माझ्याविषयी. तो कोण राजीनामा मागणार?”, असंदेखील उत्तर अंबादास दानवे यांनी दिलं.
“भाजपवाल्यांचा आज सकाळपासून कामकाज चालवण्याचाच मूड दिसला नाही. काहीही करुन सभागृहाचं कामकाज रोखायचं, त्याला दुरसरीकडे घेऊन जायचं, आम्हाला बोलू द्यायचं नाही, त्यांचा हाच मूड मला दिसत होता. त्यामुळे त्यांनी लोकसभेचा मुद्दा सभागृहात मांडला. आमच्या सभागृहाचा काही संबंधच नाही. जे लोकसभेत झालं ते लोकसभा बघणार. लोकसभा देशाचं सर्वोच्च सभागृह आहे. ते पाहणार ना ते की विधान परिषद पाहणार?”, असा सवाल दानवे यांनी केला.
“मी माझा हा मुद्दा सभागृहात मांडला. त्यांनी सभापतींसोबत बात करणं सोडून माझ्याशी आक्रमकपणे बातचित केली. तर मी त्यांना आक्रमकपणे उत्तर दिलं”, असंदेखील अंबादास दानवे म्हणाले. “सभागृहाची प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी सर्वांची असते. ते माझंही काम आहे, तसेच त्यांचंही काम आहे. त्यांना रोखणं हे सभापतींचं काम होतं. सभागृह हे त्यांच्या घराची जहांगिरी आहे, असं ते वागत आहेत. सभापती असतील, भाजपचे सदस्य असतील, सभागृहाचा वापर ते करत आहेत. कुठलाही विषय असेल, लक्षवेधी चालू असेल तर वेगळा मुद्दा मांडतात, आम्ही त्यांचं सहन करतो. आम्ही जे बोलतो ते त्यांना सहन होत नाही”, अशी भूमिका अंबादास दानवे यांनी मांडली.
“हे बघा जिथे हिंसाची गरज असते तिथे हिंदू हिंसक होतो. मी सांगतो की, माझ्यावरही काही केसेस आहेत. हिंदूत्वाच्या मुद्द्यावरूनही केसेस आहेत. त्याचा मला कोणताही पश्चात्ताप नाही. हे सर्व बोलणारे डुप्लिकेट लोकं आहेत. भाजपवाले काय हिंदुत्ववादी आहेत? ते आम्हाला हिंदुत्व शिकणार का, अरे आम्ही रस्त्यावरचे हिंदुत्व आहेत. जे शेपूट घालून भाजपवाले पळतात त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही”, असं अबादास दानवे म्हणाले.