मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने थेट वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप केला. त्यामुळे राठोड यांच्यावर कारवाई करण्यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढत होता. तब्बल सहा दिवसानंतर या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चौकशी झाल्यावरच दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे राठोड यांच्यावरील कारवाई तूर्तास टळली असून राठोड यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचे अनेक अर्थ काढले जात आहेत. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. (why cm Uddhav Thackeray not taken action against sanjay rathod?, read report)
मुख्यमंत्री नेमके काय म्हणाले?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवडी ते न्हावा शेवा ट्रान्सहर्बर प्रकल्पाच्या कामाच्या पाहणीसाठी आले होते. यावेळी त्यांना पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. “या संदर्भात व्यवस्थित चौकशी केली जाईल… जे सत्य आहे ते बाहेर येईलच…यामध्ये ज्यांच्यावर कारवाईची गरज आहे त्यांच्यावर कारवाई होईल. या संदर्भात सखोल चौकशी केली जाईल. पण गेले काही दिवस काही महिने… एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जातोय…असाही प्रयत्न होता कमा नये… आणि सत्यही लपवण्याचा प्रयत्न होता कामा नये… या मध्ये जे सत्य असेल ते संपूर्ण चौकशी करून जनते समोर येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
46 सेकंदात…
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर गेल्या सहा दिवसांपासून राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी हा प्रश्न लावून धरतानाच राठोड यांच्यावर कारवाईची आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी केवळ 46 सेकंदात या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पहिला मुद्दा
मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेत दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक म्हणजे चौकशी करून सत्य बाहेर आणून. त्यानंतर दोषींवर कारवाई करू. दुसरा मुद्दा म्हणजे कुणावरही अन्याय होऊ नये. अनेकदा आरोप केला जातो आणि एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे तसं होता कामा नये. मुख्यमंत्र्यांचा पहिला मुद्दा हा पोलीस तपासाशी संबंधित आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता मुख्यमंत्र्यांना भेटून गेले. गुप्ता यांनी मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाची सर्व माहिती दिली. तपास प्राथमिक स्टेजला असल्याने घाईत कोणता निर्णय घ्यायला नको, असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल. त्यामुळेच त्यांनी तपास पूर्ण होईपर्यंत वाट पाहण्याचा निर्णय घेतला असल्याचं दिसून येतं.
दुसरा मुद्दा
मागील काही महिन्यांपासून एखाद्यावर आरोप करायचे आणि त्याला आयुष्यातून उठवयाचे असा प्रकार राज्यात सुरू असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या या म्हणण्याला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाची पार्श्वभूमी आहे. मुंडेंवरही एका महिलेने बलात्काराचे आरोप केले होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी मागणी केली होती. नंतर या महिलेवरच काही पुरुषांनी आरोप केल्यानंतर या महिलेने आरोप मागे घेतले होते. मात्र, तोपर्यंत धनंजय मुंडे यांची प्रचंड बदनामी झाली होती. राठोड यांच्या बाबतीतही तसे होऊ नये म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचं राजकीय निरीक्षक सांगतात.
दोन प्रकरणं वेगळी, न्याय एक का?
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी एखाद्यावर आरोप करायचे आणि त्याला आयुष्यातून उठवायचे असे प्रकार घडत असल्याचं सांगत राठोड यांना तूर्तास दिलासा दिला. मुख्यमंत्र्यांच्या या वेट अँड वॉचच्या भूमिकेमागे मुंडे प्रकरणाची पार्श्वभूमी होती. पण मुंडे प्रकरणात बलात्काराचा आरोप एका महिलेने केला होता, तर राठोड प्रकरणात एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. या तरुणीने राठोड यांच्यावर कोणताही आरोप केलेला नाही. तिने सुसाईड नोटही लिहून ठेवलेली नाही. त्यामुळे या महिलेने राठोड यांना फसवल्याचंही म्हणता येत नाही. उलट राठोड यांच्या संभाषणाच्या काही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यानुषंगाने त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गंभीरपणे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राठोड यांना मंत्रिमंडळातून बाजूला करायला हवे होते. मंत्रिपदावर राहून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी कशी होईल? मृत तरुणीला न्याय कसा मिळेल? आणि मंत्रिपदावरील व्यक्तीचा पोलीस तपास कसा करतील? व्हायरल क्लिपबाबत मंत्र्याची पोलीस साक्ष कशी नोंदवतील? असे सवाल राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केले जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी मुंडे आणि राठोड प्रकरणाकडे एकाच चष्म्यातून पाहायला नको होते. राज्याचे प्रमुख आणि एका जबाबदार पक्षाचे प्रमुख नेते म्हणूनही त्यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करण्यासाठी राठोड यांचा राजीनामा घ्यायला हवा होता, असंही राजकीय जाणकारांनी सांगितलं. (why cm Uddhav Thackeray not taken action against sanjay rathod?, read report)
राठोडांचं पक्षातील योगदान
राठोड यांना तूर्तास दिलासा देण्यामागे त्यांचं पक्षातील मोठं योगदान हेही एक कारण समजलं जातं. राठोड हे यवतमाळचे आहेत. विदर्भात शिवसेना वाढवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्या नेत्यावर थेट कारवाई करणं हे शिवसेनेला परवडणारं नव्हतं. त्यामुळे भविष्यात पक्षालाच मोठं नुकसान झालं असतं. शिवाय राठोड यांच्यावर कारवाई केली असती तर विरोधकांच्या हाती आयताच मुद्दा गेला असता. त्यामुळे पक्षाची प्रतिमाही मलिन झाली असती. त्यामुळेही मुख्यमंत्र्यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर वेट अँड वॉचची भूमिका घेतली असावी, असं अंदाज राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. (why cm Uddhav Thackeray not taken action against sanjay rathod?, read report)
संबंधित बातम्या:
कोण आहे अरुण राठोड? जो सातत्यानं पूजा आणि मंत्र्यांच्या संपर्कात होता?
भाऊ, पूजा ताई र आत्महत्या छ कि घात पात हाई?; फेसबुकवर राठोडांना नेटकऱ्यांचा सवाल
(why cm Uddhav Thackeray not taken action against sanjay rathod?, read report)