मुंबई: हिवाळा सुरू होताच दिल्लीत कोरोनाची संख्या वाढताना दिसत असून मुंबई मात्र सावरल्याचं दिसून येत आहे. दिल्लीतील नागरिकांचा निष्काळजीपणा आणि सरकारचा हलगर्जीपणा कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्यास कारणीभूत असल्याचं एका सर्व्हेतून आढळून आलं आहे. सणांमध्ये वाढलेली नागरिकांची गर्दी, मेट्रो आणि बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा घाईने घेतलेला निर्णय, लॉकडाऊनमध्ये दिलेली सवलत, कोविड सेंटरची कमतरता आणि मोहिमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आलेलं अपयश या पाच कारणांमुळे दिल्लीतील कोरोना नियंत्रणाचा कार्यक्रम फसल्याचं या अहवालातून पुढे आलं आहे. (why corona cases increase in delhi more than mumbai?)
‘इंडिया टुडे’ने मुंबई आणि दिल्लीच्या कोरोना परिस्थितीचा तुलनात्मक अभ्यास करून दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची पाच मुख्ये कारणे नमूद केली आहेत. तुलनेत मुंबईने कोरोनावर अत्यंत सुयोनियोजितपणे नियंत्रण आणल्याचंही नमूद केलं आहे.
कपडे बदला, कोरोना रोखा
हिवाळा सुरू झाला असून दिल्लीमध्ये कोविड बाधितांची संख्या वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तथापि, याबाबत एका डॉक्टराने तपमान व कोविड याचा थेट संबंध नसल्याचे सांगितले आहे. मात्र, हिवाळ्यात लोकांचे हात धुण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचबरोबर दिल्लीकरांकडून सतत कपडे बदलण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे संसर्गात वाढ होऊ शकते, असे या डॉक्टराने नमूद केल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
अहवालातील निष्कर्ष
- मुंबईमध्ये कोविडचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत असले तरी, दिल्लीमध्ये अद्याप तशी परिस्थिती नाही.
- आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणारे धारावी हे जगासाठी ‘रोल मॉडेल’ ठरले.
- मुंबईत कोविडवर नियंत्रण मिळविण्यात मुंबई तुलनेने अधिक यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे. यामागील कारणांचा अभ्यास केला असता मुंबईत टाळेबंदीची (लॉकडाऊन) अधिक प्रभावी अंमलबजावणी हे प्रमुख कारण असल्याचे दिसून येते.
- महाराष्ट्रात आणि मुंबईत सर्व प्रकारच्या उत्सवांवर आणि संमेल्लनांवर बंधने घालण्यात आली. त्यामुळे बहुदा यंदाच्यावर्षी प्रथमच गणेशोत्सव अतिशय नियंत्रणात संपन्न झाला. दिवाळी दरम्यान दरवर्षी आढळून येणारे सामुदायिक उत्सवाचे वातावरण यंदा नव्हते. त्याचबरोबर छट पुजेच्या उत्सवांच्या निमित्ताने समुद्रकिनारी होणाऱ्या विधींवर देखील बंदी घालण्यात आली.
- दिल्लीमध्ये देखील टाळेबंदी विषयक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. मात्र, त्यासोबतच काही बाबतीत सूट देण्यात आली.
- या अभ्यासाच्या अनुषंगाने दिल्लीतील ३ डॉक्टरांशी संवाद साधण्यात आला. सदर तिन्ही डॉक्टरांनी सणांच्या अनुषंगाने गर्दी वाढल्याने दिल्लीत कोविड बाधितांची संख्या वाढल्याचे नमूद केले.
- दिल्लीमध्ये दिल्ली मेट्रोसह सिटी बस सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आली. तर त्याचवेळी मुंबईमध्ये मात्र लोकल ट्रेन, शाळा, मॉल्स यावर बंधने आहेत.
- मुंबईमध्ये कोविड संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवण्यासोबतच रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तिंची देखील चाचणी व पडताळणी सातत्याने करण्यात येत आहे. मुंबईमध्ये ‘आरटीपीसीआर’ चाचण्यांवर भर देण्यात येतोय, तर दिल्लीमध्ये ‘रॅपिड अँटिजेन टेस्ट’ (RAT) यावर भर देण्यात येत आहे. तथापि, दिल्लीमध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या मुंबईच्या तिप्पट असल्याचे दिसून येत आहे. ‘आरटीपीसीआर’ चाचण्या या ‘रॅपिड अँटिजेन टेस्ट’च्या तुलनेत अधिक विश्वासार्ह मानल्या जातात.
- कंटेन्मेंट झोन इत्यादीबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे ड्रोन व सीसीटीव्ही सारख्या बाबींच्या सहाय्याने लोकांना केवळ सूचित केले नाही तर, या अनुषंगाने आवश्यक त्या बाबींची अंमलबजावणी करण्यात येत असल्याची खात्री वेळोवेळी केली.
- मुंबईत ज्या व्यक्तिंमध्ये लक्षणे आढळून आली त्यांना तातडीने विलगीकरण कक्षांमध्ये स्थानांतरित करण्यात येत आहे.
- मुंबईत सार्वजनिक शौचालयांचे सातत्याने व नियमितपणे सॅनिटायजेशन करण्यात येत आहे.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेने सातत्याने जनजागृती मोहिमांची परिणामकारक अंमलबजावणी केली. नुकतीच राबविण्यात आलेली ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही देखील अशाच प्रकारची एक मोहीम होती. या मोहिमे अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घरोघर जाऊन घरातील ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांचे सर्वेक्षण केले.
- मुंबईमध्ये सार्वजनिक ठिकाणी वावरताना मुखावरण अर्थात फेस मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच जे नागरिक फेस मास्क न वापरता सार्वजनिक ठिकाणी आढळून येतील, त्यांना दंड आकारणी करण्यात येत आहे.
- दिल्लीमध्ये देखील विविध प्रकारच्या मोहिमा सुरु करण्यात आल्या. मात्र, सदर मोहिमांची अंमलबजावणी तेवढ्या कडकपणे होऊ शकली नाही.
- कोविड बाधित रुग्णांवर परिणामकारक उपचार व्हावेत, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे वरळी, वांद्रे-कुर्ला संकुल, गोरेगाव, दहिसर इत्यादी ठिकाणी जम्बो कोविड फॅसिलिटी सुरु केली. तथापि, दिल्लीमध्ये अशा प्रकाराच्या सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.
- बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १७ हजार ४६७ खाटा या कोविड बाधित रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या.
- हिवाळ्यादरम्यान दरवर्षी प्रदूषण पातळी वाढत असल्यामुळे कोविड संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याचे दुसऱ्या एका डॉक्टरांनी नमूद केले आहे.
संबंधित बातम्या:
(why corona cases increase in delhi more than mumbai?)