मुंबई : जेपी नड्डा यांचा मुंबईशी काय संबंध? मुंबईत येऊन लुडबुड करू नका. मुंबई ताब्यात घेण्यासाठी आपण प्रयत्न करत आहात हे माहीत आहे. देशातील भ्रष्टाचारावर आपण बोला. कर्नाटकात आपण का हरलात त्याच्यावर बोला, असं आव्हान देतानाच वीर सावरकरांच्या संदर्भात ज्या भूमिका शिवसेनेने घेतलेल्या आहेत, त्या विज्ञानवादी आणि हिंदुत्ववादी आहेत. गोमूत्रधारी हिंदुत्व हे सावरकरांना मान्य नाही. त्यावर जे पी नड्डा यांनी बोलावं. जे गोमूत्रधारी आहेत तेच दंगलखोर आहेत. त्यांची पहिली चौकशी करा, अशी मागणीच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
संजय राऊत यांनी यावेळी हक्कभंगाच्या नोटिशीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. सामान्यांचा आवाज जर मी उठवला असेल त्यासाठी मला शिक्षा होणार असेल, तर माझी तयारी आहे. मी विधिमंडळाला चोरमंडळ असं म्हटलेलं नाही. घटनाबाह्य पद्धतीने जे विधिमंडळात गेले आणि सरकार बनविलं ते चोरमंडळ आहे ही माझी भूमिका आहे. संपूर्ण विधिमंडळाने स्वतःला चोरमंडळ म्हणून घेणे हे चुकीचं आहे. समिती समोर मी माझी बाजू मांडेल, असं संजय राऊत म्हणाले.
घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने घटनेची रखवाली करायची असते. परंतु या पदावर बसलेले व्यक्तीच घटनेचे मारेकरी ठरत आहेत. विधानसभेचे अधिवेशन सुरू नाही. तरीदेखील परदेशात आणि देशात अध्यक्ष अनेक मुलाखती देत आहेत आणि त्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्याकडे असलेल्या खटल्या संदर्भात जाहीर भाषण करू नये असे संकेत आहेत. त्यांना अभ्यास करण्याची काहीच गरज नाही. जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा तेच अध्यक्ष होते. चांगला घटना तज्ज्ञ असता तर 24 तासात हे प्रकरण आटोपलं असतं, असा टोलाही त्यांनी लगावला.
किरेन रिजीजू यांना कायदा मंत्रीपदावरून हटवण्यात आलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कायदामंत्री पदावर बसू शकेल आणि न्यायव्यवस्था कायदा अत्यंत स्वतंत्रपणे सांभाळू शकेल अशी व्यक्ती केंद्रीय मंत्रिमंडळात नाही. किरेन रिजीजू यांनी ज्या पद्धतीने न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे संपूर्ण न्यायवृंद हे कायदा मंत्र्यांच्या विरोधात होतं. त्याची दखल सरकारला घ्यावी लागली. दबावाला न्यायव्यवस्था बळी पडली नाही आणि शेवटी किरेन रिजूजी यांनाच बदलावं लागलं, असं राऊत म्हणाले.
रावसाहेब दानवे यांनी पुन्हा लोकसभा निवडणुकीला उभं राहून दाखवावं. महाविकास आघाडी त्यांचा पराभव करेल, असं एका प्रश्नाला उत्तर देतानाच आमची बीड, नांदेडला सभा आहे. आम्ही सगळे नेते महाराष्ट्रभर फिरत आहोत, सगळे नेते बीडच्या सभेला जमणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं.